शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

आपला झोका उंचच जायला हवा हा अटटाहास कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 07:15 IST

आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत हा अट्टाहास तरी कशाला? ज्यानं-त्यानं ठरवावं आपला झोका केवढा नि तो कसा झुलावा.

-सोनाली लोहार

लहानपणी आमच्या वाडीत एका घरात मोठ्ठा लाकडी झोपाळा होता. अगदी तसाच एक झोपाळा बाजूच्याच गावात राहणार्‍या मामाच्या घरात पण होता. चांगला दणकट शिसवी लाकडाचा. 

छपराच्या नाहीतर माडीच्या तुळ्यांना पितळी कड्यांनी अडकवलेले ते झोपाळे. त्याच्यावर ऐसपैस उशी टाकून झोपता पण यायचं. घराच्या बाहेर हिरवीकंच आमराई, बाहेर सुरू असलेल्या पाटाच्या पाण्याचा झुळझुळ आवाज, हातात चांदोबा नाहीतर किशोर घेऊन त्या झोपाळ्यावर बसलं की तंद्री लागायची. गंमत म्हणजे त्या झोपाळ्याला झोका द्यायला लागायचा नाही, कसा काय माहीत नाही पण तो आपला संथ हलत राहायचा. आमच्या वाडीतल्या मुलांना काही त्या झोपाळ्यावर यायला आवडायचं नाही.  ‘मुलींचा झोका आहे तो, जरा जोरानं रट्टा दिला तर कड्या निघून येतात, तुम्हीच खेळा त्याच्यावर’ म्हणत ती निघून जायची. आमच्यात एक टॉम्बॉयिश मुलगी होती, तिला फार आवडायचं उंच उंच झोके घ्यायला. मग ती मुलांबरोबर बागेतल्या झोपाळ्यावर खेळायला जायची. खो खो आणि कबड्डी, ए-वन खेळायची. जेव्हा बघावं तेव्हा तिचे गुढघे नाहीतर ढोपरं फुटलेली. तिची आई नेहमी ओरडायची, ‘वाडीतल्या झोपाळ्यावर खेळायला काय होतं गं तुला ! नुसती हौस मोठे झोके घ्यायची!’ त्या मुलीचं जरा लवकरच लग्न झालं. खूप वर्षांनी कुठून तरी कानावर आलं. लग्नाच्या दुस-याच वर्षी स्टोव्हचा भडक्यानं भाजून ती गेली. जाताना पदरात एक तान्ही लेक होती.

त्या झोपाळ्यावर बाहुला-बाहुलीची लग्नं वगैरे लावणा-या आमच्या घोळक्यात एक मुलगी होती. गोरीपान सुंदर, घा-या डोळ्यांची. लांब केसांची तीपेडी वेणी घालून ती दोनदा वळवून लाल रिबिनीनं तो शेपटा बांधायची. तुला मोठं होऊन काय बनायचं गं, असं कोणी विचारलं तर स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणायची, ‘मला नं, लग्न करायचंय, मला गोरी गोरी मुलं होणार, मग मी सगळ्यांसाठी जेवण बनवेन.’ ऐकणारे जोरात हसायचे. तिचे वडील डॉक्टर होते. पुढे त्यांनी तिला डॉक्टरच बनवलं. मेरिटवर अँडमिशन मिळेना म्हणून बाहेरगावच्या खासगी कॉलेजात टाकलं. नंतर परदेशीही पाठवलं. बरेच वर्षांनंतर एकदा आमची गाठ पडली. ती वडिलांचाच दवाखाना सध्या चालवतेय. तिची स्वप्नाळू नजर कधीच हरवलीय. कोणीतरी तिच्या झुल्याला उंच झोका दिला आणि तिच्या झोपाळ्याची लयच बिघडली. लग्नाचा काही योगच आला नाही. आता वयही वाढलंय. स्थळ सांगून येणंही हळूहळू बंद झालं. निघताना न राहावून तिनं मला विचारलं, ‘तुला वाडीतली झोपाळ्यावरची आपली भातुकली आठवते का गं ?’  माझ्या घशात आवंढा दाटून आला. 

प्रत्येकाचा झोका वेगळा. त्याची उंची किती हवी हा ज्याचा-त्याचा प्रश्न, तो दुस-यानी का ठरवावा आणि आपणही तो दुस-याना का ठरवू द्यावा?व्यवसायाच्या निमित्तानं माझा अनेक कलाकारांशी परिचय होत असतो. असंच मधे एकदा अत्यंत सुरेल आणि गोड गळा असणा-या एका गायकाला भेटण्याचा योग आला. भल्या भल्या प्रस्थापितांच्या वरचढ ठरेल अशी अप्रतिम गायकी. पण तरीही कुठल्याही झगमगाटी दुनियेत हे नावं मी फारसं कधी ऐकलं नव्हतं. एकदा सविस्तर बोलणं झालं, ‘असं का? तुम्ही थोडा प्रयत्न केला असता तर आज कुठल्या कुठे असता, कोणी अडवलं होतं तुम्हाला?’   ‘मला कोणासारखंतरी बनायचं आणि गायचंही नाहीये, मला मान-सन्मान नकोत. मी फक्त स्वान्तसुखाय गातो. माझ्यासाठी गाणं ही देवाची पूजा आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्याइतका आनंदी माणूस तुम्हाला खरंच सापडणार नाही.’ - ते शांत हसत म्हणाले. 

त्यावेळी लक्ष गेलं, योगायोगानं त्यांच्या घरात तोच लाकडी झोपाळा होता. देवासमोर निरांजन तेवत होतं. मोगर्‍याचा हलका सुवास पसरला होता. शांत, पवित्र  वातावरण. कसलीही आणि कुठेही पोहोचायची घाई नाही, चढाओढ नाही, तिथे फक्त आणि फक्त संथ चाललेली संगीतसाधना होती.

आमच्या ओळखीच्या एक काकू आहेत. सदैव आनंदी. प्रसन्न चेहरा. त्यांचं घर अगदीच छोटं आहे. आणि त्या छोट्याशा खोलीतही अगदी खिडकीला लागून असा वेताचा एक छोटा झोपाळा लावलाय.  ‘खूप गर्दी झाल्यासारखी नाही वाटत का त्या झोपाळ्यामुळे?’  एकदा मी काकांना विचारलं. ते म्हणाले, ‘अगं, तुझ्या काकूचं माहेर खूप तालेवार आणि गडगंज. तिला आवडायचं म्हणून तिच्या वडिलांनी अंगणातच मोठ्ठा झोपाळा बांधला होता. ती रोज रात्री त्याच्यावर बसून आकाशातल्या चांदण्या मोजायची. आमचा प्रेमविवाह झाला आणि तिचं माहेर तुटलं. ती खूप बुद्धिमान आहे. तिच्या आयुष्याकडून नक्कीच खूप अपेक्षा असणार. त्या सगळ्या काही मी पु-या करू शकलो नाही. आमच्या ओढग्रस्तीच्या संसारात तिच्या डोक्यावरचं विस्तीर्ण आकाशही माझ्या घराच्या छोट्याशा खिडकीत एकटवलं. माझ्या  प्रेमाखातर तिनं तिचा झुला माझ्या छताखाली आणलाय. आता कमीतकमी मी तिच्या चांदण्या तरी हिरावणार नाही गं.’ 

मला माझी आईच आठवली. आयुष्यभर निगुतीनं, अपार मायेनं, अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतही हसतमुखानं जिनं संसार केला अशी माझी आई. ती अत्यंत सुंदर चित्रं काढायची. पांढ-या स्वच्छ नाजूक रूमालावर एका कोप-यात तिनं रंगवलेली ती सुंदर फुलं. ओळखीची मंडळी ते रूमाल मागून मागून घेऊन जायची. सगळ्या  कामाच्या धबडग्यात कसाबसा वेळ काढून ती ते रंग भरायची. तो तिचा झुला होता. तो कुठेही उंच उडाला नाही. तो उंच उडववावा असं तिला कधी वाटलंच नसणार का? मला माहीत नाही, पण ती नेहमीच समईसारखी शांत आणि तृप्त वाटायची. 

आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत असा अट्टाहास कशाला? म्हणजे उंच झोके घेऊ नयेत असं काही नाही. घ्यावेत की, त्याचीही एक आपली गंमत असतेच; पण तेव्हा हेसुद्धा लक्षात ठेवावं की उंच गेलेला झोका हा कधीतरी खालीही येतोच. तो निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे त्या उतरण्याचंही तितक्याच प्रेमानं स्वागत करण्याची मनाची तयारी असायला हवी. आणि मगच घ्यावे उंच झोके. बरेचदा, उंचावरच  राहण्याचा अट्टाहास आयुष्यात खूप काहीतरी गमवायलाही कारणीभूत ठरू शकतो. 

संथ हलणा-या झुल्यांनाही त्यांची स्वत:ची एक उंची असतेच की. ती आपण ओळखली पाहिजे, त्याचंही कौतुक असलं पाहिजे. मन आपसूकच  शांत आणि तृप्त होतं. ती शांतता आणि तृप्तता अनुभवली की आपोआपच आपण प्रेमानं म्हणतो, ‘संथ माझा झुला गं!’

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)

 sonali.lohar@gmail.com