बलिदान मासमध्ये विद्यार्थ्यांना चप्पल घालण्याची सक्ती का?
By संतोष भिसे | Updated: March 16, 2025 15:05 IST2025-03-16T15:05:18+5:302025-03-16T15:05:40+5:30
बलिदान मास सुरू असताना विद्यार्थ्यांना चप्पल, बूट घालण्याची सक्ती का करता? असा जाब विचारणारी झुंडशाही सांगलीत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये घडली.

बलिदान मासमध्ये विद्यार्थ्यांना चप्पल घालण्याची सक्ती का?
सांगली : बलिदान मास सुरू असताना विद्यार्थ्यांना चप्पल, बूट घालण्याची सक्ती का करता? असा जाब विचारणारी झुंडशाही सांगलीत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये घडली. १५ ते २० कार्यकर्त्यांनी शाळेत मुख्याध्यापिकेच्या दालनात घुसखोरी केली. त्यांना दमदाटी केली. या झुंडशाहीला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला.
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. काही समाजकंटकांनी शाळेत घुसून दंगा केला. मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य ॲड. अजित सूर्यवंशी यांना तात्काळ याची माहिती दिली. ॲड. सूर्यवंशी शाळेत गेले असता समाजकंटकांनी त्यांनाही जाब विचारून दंगा घातला. तुम्ही विद्यार्थ्यांना बूट आणि टोपी घालण्यास सक्ती का करता? याचा जाब द्या, असे धमकावले. विद्यार्थ्यांना प्रांगणात एकत्र करुन जबरदस्तीने प्रार्थनाही घेतली. ॲड. सूर्यवंशी यांच्या अंगावर ते धावूनही गेले.
या घटनेसंदर्भात शाळेतर्फे पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि पोलिस उपाधीक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. दरम्यान, या गुंडगिरी व झुंडशाही प्रवृत्तीच्या विरोधात रविवारी कामगार भवनमध्ये पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी या घटनेचा निषेध करण्यात आला. अशा प्रवृत्तींच्या बंदोबस्तासाठी कृती कार्यक्रम ठरवण्यात आला.
बैठकीला उमेश देशमुख, जयवंत सावंत, जगदीश काबरे, अंनिसचे राहुल थोरात, सुनील भिंगे, मुख्याध्यापिका शुभांगी जगताप, प्रतापसिंह मोहिते -पाटील, सुदर्शन चोरगे, संदीप कांबळे, प्रवीण कोकरे, रोहित शिंदे, अभिजित पोरे, अक्षय सुनके, मारुती शिरतोडे, हिंमतराव मलमे, जनार्दन गोंधळी, तानाजी पाटील, तुळशीराम गळवे, राजवर्धन जाधव आदी उपस्थित होते.
असा करणार प्रतिकार
सोमवारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देणार, विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा घडवून आणण्यासाठी आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित करावा यासाठी त्यांना पत्र देणार, सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर सरोजमाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करणार, कामगार भवनमध्ये संभाजी महाराजांविषयी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करणार.