तिसऱ्या आघाडीचा धक्का कोणाला?
By Admin | Updated: October 28, 2016 23:58 IST2016-10-28T23:58:09+5:302016-10-28T23:58:09+5:30
इस्लामपूर नगरपालिका निवडणूक : ‘विश्वासा’वर लावलेला कौल

तिसऱ्या आघाडीचा धक्का कोणाला?
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी विकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने कंबर कसली असून, शहरातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी केली आहे. अचानक रिंगणात उतरलेल्या तिसऱ्या आघाडीचा धक्का कोणाला बसणार, याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची इस्लामपूर पालिकेतील राष्ट्रवादीवर मांड आहे. मात्र त्यांचे कट्टर समर्थक निशिकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच विरोधी गटात प्रवेश केला. निशिकांतदादांसारखा तगडा उमेदवार हाताशी येताच विरोधी आघाडीनेही लगोलग त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून टाकली. या धक्क्यासोबत आ. पाटील यांचे विश्वासू सहकारी दिलीपतात्या पाटील यांनीही विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीवर तोफ डागली. याची जोरदार चर्चा सुरू असतानाच नगरपालिकेच्या निवडणुकीत डाव्या विचारांच्या तिसऱ्या आघाडीने उडी घेतली आहे. कासेगाव येथील मानवाधिकार संघटनेचे अनिल माने, कॉम्रेड धनाजी गुरव आणि बळिराजा संघटनेचे बी. जी. पाटील यांनी तिसऱ्या आघाडीच्या रूपाने सर्वांच्या गुरूस्थानी असलेले माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन तिसऱ्या आघाडीची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचार्य सायनाकर यांच्या उमेदवारीची सर्वसामान्यांतून चर्चा सुरू झाली आहे.
आधीच निशिकांतदादा पाटील यांच्या उमेदवारीचा राष्ट्रवादीने चांगलाच धसका घेतला आहे. राष्ट्रवादीकडून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे अॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्या नावांबाबत चाचपणी सुरू आहे. त्यातच प्राचार्य सायनाकर यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे, अभ्यासू व जनमानसात आदर असलेले व्यक्तिमत्त्व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मानवाधिकार पक्षाचे अनिल माने यांनी कऱ्हाड, इस्लामपुरात कार्यालये स्थापन करून तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर आणला आहे. माने यांनी डाव्या विचारांच्या मंडळींसह गत विधानसभा निवडणूक लढवलेल्या बी. जी. पाटील यांच्याशी हातमिळवणी करून, स्वच्छ प्रतिमेचे माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या रूपाने राष्ट्रवादी आणि निवडणुकीपुरते एकत्र आलेल्या विकास आघाडीला आव्हान दिले आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीबाबत शहरामध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच स्पर्धा
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून विजयभाऊ पाटील, विकास आघाडीकडून निशिकांतदादा पाटील, तिसऱ्या आघाडीकडून विश्वास सायनाकर हे दिग्गज उमेदवार प्रथमच मैदानात उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होणार असल्याचे दिसत आहे.