फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:53+5:302021-03-24T04:24:53+5:30

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने ...

Who gave the right to phone tapping? | फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले?

फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले?

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने झाले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार केल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे ते म्हणाले.

पाटील म्हणाले की, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आस्थापना बोर्डाच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदल्यांबाबत शुक्ला यांचा अहवाल खोटा आहे. अहवालात संदीप बिष्णोई यांची बदली नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होणार असल्याचे म्हटले होते पण त्याची बदली रेल्वे अप्पर पोलीस आयुक्त झाली आहे. संजयकुमार वर्मा यांची बदलीच झालेली नाही. विनयकुमार चौबे, बी. के. सिंग यांच्या बदल्याही अहवालात नमूद ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेली उदाहरणे चुकीची आहेत, असे काहीच घडलेले नाही. उलट फडणवीस गृहमंत्री असताना आस्थापना बोर्डाला डावलून पोलीस अधिकाऱ्यांचा थेट बदल्या केल्या होत्या. त्यात पारदर्शकता नव्हती. त्यांच्या काळात किती अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या केल्या हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही दिले.

रश्मी शुक्ला यांच्या अहवालात गृहमंत्र्यांवर कोणताही आरोप नाही. त्यातील आरोप ठेवलेल्या व्यक्ती या खासगी आहेत. एकच व्यक्ती उच्चश्रेणीतील अधिकारी आहे पण फोन टॅपिंगचे अधिकार त्यांना कुणी दिला, याची चौकशी होण्याची गरज आहे.

चौकट

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

वास्तविक अंबानीच्या घरासमोर वाहन, मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन मूळ विषय आहेत. हिरेन मृत्यूचा तपास एटीएसने अंतिम टप्प्यात आणला होता; पण आता हा तपास एनआयएने काढून घेतला आहे. एटीएसला आणखी चार दिवस मिळाले असते तर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचले असते. या दोन्ही विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच फडणवीस यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

चौकट

विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत

महाराष्ट्रात काहीही घडले की विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत आहे. एखादी घटना घडल्यावर त्याचा तपास व्हावा, चौकशी व्हावी, असे त्यांचा आग्रहच नसतो. उठसूट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगले रूळले आहेत. पण त्यांचा डोळा सत्तेकडेही आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपदालाही न्याय देऊ शकणार नाही. ते भाजपच्या दृष्टीने चांगले नाही, असा चिमटाही पाटील काढला.

Web Title: Who gave the right to phone tapping?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.