Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे?

By हणमंत पाटील | Published: April 1, 2024 03:24 PM2024-04-01T15:24:43+5:302024-04-01T15:25:24+5:30

संजय राऊत, जयंत पाटील व विश्वजित कदम यांची भूमिका निर्णायक

who caused the failure in Mahavikas Aghadi In Sangli, Hatkanangle constituencies | Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे?

Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे?

हणमंत पाटील

सांगली : सांगलीनंतर महायुतीने हातकणंगलेमध्ये उमेदवार जाहीर केला. तरी महाविकास आघाडीतील गोंधळ अजून संपलेला नाही. त्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत, जयंत पाटील व विश्वजित कदम जबाबदार आहेत. मात्र, हे तिन्ही नेते एकत्र न येता, परस्पर वेगवेगळी भूमिका घेत असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

सांगली लोकसभा हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. त्यामुळे आजही मतदारसंघातील गावागावांत काँग्रेसची पाळेमुळे म्हणजे कार्यकर्ते आहेत. लोकसभेच्या १९ पैकी १६ लोकसभा काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र, २०१४ पासूनच्या दोन निवडणुकांत पराभव झाल्याने काँग्रेस संपली हा दावा आततायीपणाचा होतोय. कोल्हापूर लोकसभा शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याने सांगलीच्या जागेवर उद्धवसेनेने दावा केला.

दुहेरी महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश व उमेदवारी एकावेळी जाहीर करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेली काँग्रेस दुखावली. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व स्वत: इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी मुंबई व दिल्लीवारी केली. हा द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा आघाडीतील दोन्ही पक्षांतील नेते एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावू शकतात.

अशीच स्थिती हातकणंगले मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी दोनवेळा ‘मातोश्री’वर जाऊन सकारात्मक चर्चा करून आले. मात्र, अद्यापही राजू शेट्टींबाबत महाविकास आघाडी भूमिका घेण्यास तयार नाही. दरम्यानच्या काळात महायुतीकडून शिंदेसेनेने धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली. तरीही स्वाभिमानीचे शेट्टी व महाविकास आघाडी यांचे उमेदवारीचे कोडे सुटलेले नाही. हे भिजत घोंगडे ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक आहे. मात्र, त्यांनी या दोन्ही मतदारसंघांविषयीच्य भूमिकेविषयी मौन बाळगले आहे.

मौन बाळगून करेक्ट कार्यक्रम..

सांगली व हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी कमालीचे मौन बाळगले आहे. तरीही सांगलीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्राहार पाटील यांना त्यांचेच पाठबळ असल्याची आता उघडपणे चर्चा आहे. तसेच, हातकणंगले मतदारसंघातही राजू शेट्टी यांच्या उमेदवारीविषयी भूमिका घेण्याऐवजी महायुतीतील बंडखोर राहुल आवाडे यांना उद्धवसेनेचा मार्ग दाखविण्यातही पाटील यांचीच फूस असल्याचे उघडपणे बोलले जातेय.

दिल्ली दौऱ्याने प्रश्न सुटणार का?

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी मुंबई व दिल्ली दौरे केले. त्याऐवजी मतदारसंघात मेळावा घेऊन दबाव गट निर्माण का केला नाही? मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी मिळाली नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेसची भूमिका काय, हे डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीर केले पाहिजे. तरच काँग्रेसचे कार्यकर्ते व मतदारांमध्ये स्पष्टता येईल.

Web Title: who caused the failure in Mahavikas Aghadi In Sangli, Hatkanangle constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.