मसुचीवाडी प्रकरण पेटवतंय कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:26 IST2016-05-18T23:27:55+5:302016-05-19T00:26:14+5:30
सरपंचांपुढे मोठे आव्हान : राजकारणामुळे गावांमधील धग कायम

मसुचीवाडी प्रकरण पेटवतंय कोण?
अशोक पाटील -- इस्लामपूर --मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणात बोरगावचे नाव बदनाम झाले आहे. महिला संघटनांनीही यामध्ये राजकारण आणल्याने हे प्रकरण गेल्या १५ दिवसांपासून धगधगत राहिले आहे. सरपंच सुहास कदम यांच्यावर पोलिसांचा दबाव असून बोरगावसह मुख्य सूत्रधार असलेल्या गुंडासह राजकारण्यांचीही भीती आहे. हे प्रकरण कोण पेटवत आहे, याबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे.मुलींना न्याय देण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दोनवेळा मसुचीवाडी गावाला भेट देऊन नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. मुख्य आरोपीस तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अन्यथा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी पहिल्या भेटीवेळी दिला होता. १५ दिवस झाले, मुख्य आरोपी फरारीच आहे. मग देसाई यांच्या ठिय्या आंदोलनाचे काय झाले, त्यांचा इशारा पोकळच ठरला, अशी चर्चा सुरू झाली आहे.
देसाई यांच्या या भूमिकेवर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी टीका केली होती. देसाई यांनी या प्रकरणात राजकारण आणू नये, असा सल्लाही दिला होता. या घटनेनंतर १0 दिवसांनी आमदार गोऱ्हे यांनी मसुचीवाडी येथे येण्याचा घाट घातला. खरे तर मसुचीवाडी येथील वातावरण शांत झालेले आहे, आपण येऊ नये, अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली होती. परंतु राजकीय हेतूने गोऱ्हे यांनी मसुचीवाडीला भेट दिली. त्यानंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी मसुचीवाडीला भेट दिली. परंतु गावातील महिलांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला. या प्रकरणात न्याय मिळत नसेल, तर आम्ही विविध संघटना, नेत्यांसमोर का जावे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे देसाई यांनी इस्लामपूर येथे पोलिसांना आंदोलनाचा इशारा दिला.
आता सरपंच सुहास कदम यांना दूरध्वनीवरुन धमक्या येऊ लागल्या आहेत. कदम यांनी प्रसिध्दी माध्यमे, महिला संघटना आणि नेत्यांपुढे वेगवेगळे मते मांडले आहे. हे प्रकरण हाताळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
बोरगाव आणि मसुचीवाडी गावांतील वातावरण आजही धगधगत आहे. हे वातावरण शमविण्यासाठी दोन्ही गावांतील लोकप्रतिनिधी, पोलिस व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मार्ग काढणे गरजेचे आहे.