अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न, रोजगार, रस्ते, ऊसबिले, ड्रेनेज योजना अशा अनेक मुद्द्यांना धार लावून त्याच शस्त्रांच्याआधारे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात घमासान युद्ध रंगणार आहे. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांपेक्षा स्थानिक प्रश्नांवरून उमेदवारांना अधिक अडचणीत आणले जाऊ शकते, म्हणून अशा स्थानिक शस्त्रांची जुळवाजुळव जिल्ह्यात सुरू झाली आहे.जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता, आजवर बहुतांश निवडणुकांत स्थानिक मुद्द्यांनाच हत्यार करण्यात आले आहे. १९६२ पासून सुरू झालेल्या विधानसभेच्या युद्धामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, जे सुरुवातीपासून आजतागायत कायम आहेत. काही प्रश्नांची सोडवणूक झाली असली तरी, नव्याने निर्माण झालेल्या प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांसाठी त्रासदायी ठरणाऱ्या अशा मुद्द्यांचा वापर निवडणुकांसाठी केला जातो.
विरोधी उमेदवारांकडून अशा शस्त्रांसह जबरी प्रहार विद्यमान आमदारांवर केला जातो आणि आमदारांकडून झालेल्या काही कामांची व सरकारी योजनांची ढाल करून विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड दिले जाते. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत हे चित्र ठरलेले असते. जिल्ह्याच्या स्थापनेनंतर आजअखेर ५७ वर्षांत अनेक बदल झाले. प्रश्नांची तीव्रता कमी-अधिक होत असताना, नव्याने काही प्रश्न समोर आले. त्यातूनच निवडणूक मुद्दे घेऊन निवडणुका लढल्या जातात.सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. विरोधी उमेदवारांकडून प्रचारातील मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू असून, आमदारांकडून केलेल्या कामांची यादी तयार केली जात आहे. निवडणुकीसाठी कालावधी कमी असल्याने प्रचाराच्या ठराविक मुदतीत प्रभावीपणे मतदारांपुढे जाण्याचे आव्हान आमदारांसह विरोधी उमेदवारांसमोर असणार आहे. त्याची पूर्वतयारी आतापासूनच सुरू झाली आहे.