गुळाच्या ढेपेची गोडी आमच्या जीवनात कुठली? ऊस गाळताना आयुष्याचे झाले चिपाड, गुऱ्हाळ कामगारांच्या व्यथा
By हणमंत पाटील | Updated: December 13, 2023 13:01 IST2023-12-13T13:01:00+5:302023-12-13T13:01:12+5:30
Sangli News: जगण्यात ना कुठला डामडौल, ना कुठली हौसमौज! ना कुठली चेन अन् ना जगण्यात झगमगाट. वर्षभर मिळेल तो कामधंदा करत राबराब राबायचं आणि चरितार्थ चालवायचा. कष्टाची कामे करता करता आमच्या आयुष्याचेच जणू चिप्पाड झाले आहे, अशी व्यथा गुऱ्हाळघरातील कामगारांनी मांडली.

गुळाच्या ढेपेची गोडी आमच्या जीवनात कुठली? ऊस गाळताना आयुष्याचे झाले चिपाड, गुऱ्हाळ कामगारांच्या व्यथा
- हणमंत पाटील/सहदेव खोत
पुनवत - जगण्यात ना कुठला डामडौल, ना कुठली हौसमौज! ना कुठली चेन अन् ना जगण्यात झगमगाट. वर्षभर मिळेल तो कामधंदा करत राबराब राबायचं आणि चरितार्थ चालवायचा. कष्टाची कामे करता करता आमच्या आयुष्याचेच जणू चिप्पाड झाले आहे, अशी व्यथा गुऱ्हाळघरातील कामगारांनी मांडली.
शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यात सध्या गुऱ्हाळ हंगाम जोरात सुरू आहे. तेथे मोठ्या संख्येने कामगार काम करत आहेत. ठिकठिकाणाहून स्थलांतर करून आलेले कामगार गुऱ्हाळाचा हंगाम संपल्यानंतर अन्य कामांच्या शोधात निघून जातात. दरवर्षी गुऱ्हाळ हंगामात त्यांना दोन-तीन महिन्यांचा रोजगार मिळतो.
पूर्वीप्रमाणे स्थानिक लोक आता गुऱ्हाळघरात काम करत नाहीत. गुऱ्हाळ मालकांना बाहेरून कामगार आणावे लागतात. सर्रास गुऱ्हाळघरात भूमिहीन मजूर, गोसावी व गोपाळ समाजातील लोक काम करतात. कामाचा चांगला मोबदला मिळत असला, तरी हाडाची काडे करून राबल्याशिवाय पर्याय नसतो. उसाच्या घाण्यावर, चिप्पाडावर काम करणाऱ्या या कामगारांचा दिवस पहाटे पाचपासूनच सुरू होतो.
वजनदार मोळ्या उचलून चाप लावावा लागतो. तीनचार आधणांचा ऊस गाळावा लागतो. गाळप झालेली चिपाडे वाळविण्यासाठी वाहून गुऱ्हाळघराबाहेर न्यावी लागतात. हे काम दिवसभर न संपणारे असते. चुलवाणाला चिपाडाचे जळण पुरवावे लागते. वाळलेल्या चिपाडाची व्हळी घालावी लागते. दिवस मावळतीकडे निघाल्यावर थोडावेळ अंग जमिनीवर टाकण्यासाठी उसंत मिळते. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हे रहाटगाडगे सुरू होते.
मुलाबाळांच्या शिक्षणाची आबदा
गुऱ्हाळ हंगाम संपला की, दुसरे काम शोधण्यासाठी वणवण करावी लागते. जगण्याच्या या संघर्षात मुलाबाळांच्या शिक्षणाची आबदा होते. शिक्षणाअभावी ते देखील आई-वडिलांच्या मार्गावरच गुऱ्हाळघरे किंवा अन्य मजुरीची कामे करण्याच्या मार्गावर येतात. त्यांच्या जिंदगानीत कष्टाशिवाय पर्याय राहत नाही. जगण्याचे ओझे पेलताना आपण पुढारलेल्या समाजाच्या कोसो मागे राहतोय याची जाणीव कामगारांना आयुष्यभर बोचत राहते.
सुखाची तिरीप यावी म्हणून
असंघटित कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या, तरी त्यांचा प्रकाश या कामगारांपर्यंत पोहोचलेला नाही. कोणीतरी भलतेच त्यांचा लाभ उटवितात, खरे गरजू मात्र वंचितच राहतात. गुळाच्या ढेपेखाली ओझ्याने दबलेल्या आयुष्यात सुखाच्या प्रकाशाची थोडीशी तिरीप यावी इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.