कुठे गेले सुरेश खाडे?-- पंचनामा आमदारांचा

By Admin | Updated: August 28, 2014 23:03 IST2014-08-28T22:54:29+5:302014-08-28T23:03:49+5:30

मिरज पूर्व भागाचा सवाल : खराब रस्त्यांनी हाडांचीही चाळण

Where did Suresh Khade go? - Panchanama MLAs | कुठे गेले सुरेश खाडे?-- पंचनामा आमदारांचा

कुठे गेले सुरेश खाडे?-- पंचनामा आमदारांचा

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डेमय-अरुंद-निसरडे रस्ते, उखडलेले पॅचवर्क, जुनाट पूल, पुलांची दुरवस्था, खोदलेल्या चरी, खचलेल्या साईडपट्ट्या, रेंगाळलेली दुरुस्ती यामुळे मिरज पूर्वभाग जिल्ह्यात बदनाम होत आहे. येथील विद्यमान आमदार सुरेश खाडे यांनी पाच वर्षांत काय केले? रस्त्यांसाठी किती निधी आणला? त्यांचा निधी कुठे मुरला? खराब रस्त्यांमुळे हाडांच्या चाळणीची भेट देणारे आ. खाडे गेले कुठे? अशा प्रश्नांची सरबत्ती या भागातील ग्रामस्थांसह प्रवासी करत आहेत.
जिल्ह्यातील सर्वांत खराब रस्ते मिरज पूर्व भागात आहेत. या रस्त्यांची चाळण झाली असून, आता तेच रस्ते प्रवासी व वाहनधारकांच्या हाडांची चाळण करीत आहेत. वाढत चाललेले हाडांचे व मणक्यांचे विकार, वाहनांचे नुकसान, वैतागलेले एसटी महामंडळ, कमी होणाऱ्या बसफेऱ्या, खासगी वाहतूक खर्चातील वाढ, त्रासलेले चाकरमानी-प्रवासी-शेतकरी, एसटी बसेसचे नुकसान, प्रवासास लागणारा दुप्पट वेळ, वाढता पेट्रोलखर्च इतके सारे अनर्थ खराब रस्त्यांनीच केले, असेच जणू म्हणण्याची वेळ आली आहे.पूर्व भागात मिरज ते सलगरे, मिरज ते खंडेराजुरी व मिरज ते खटाव हे प्रमुख तीन मार्ग आहेत. मात्र ते तिन्ही मार्ग उखडले आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपने तिकीट दिल्यानंतर बाहेरून आलेल्या सुरेश खाडे यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. ‘मनी पॉवर’ आणि दंगलीचा परिणाम यामुळे ते निवडून आले. मात्र पाच वर्षांत त्यांनी या रस्त्यांसाठी काहीच केले नाही. निवडून गेल्यानंतर ते या भागात ना फिरकले, ना त्यांनी या प्रश्नासाठी तोंड उघडले. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आता ते या रस्त्याबाबत बोलत आहेत.मिरज ते सलगरे या रस्त्याची वाताहत पाच वर्षांपासून सुरू आहे. जनआंदोलनांच्या रेट्याने हा रस्ता आंतरराज्य मार्गात समाविष्ट झाला. जिल्हा परिषदेकडून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाला. कोट्यवधींचा निधीही मंजूर झाला म्हणे, मात्र रस्ता काही दुरुस्त झाला नाही. तीच अवस्था आरगमार्गे जाणाऱ्या मिरज-खटाव रस्त्याची आहे. यासोबत बेडग, आरग, लिंगनूर, खटाव, टाकळी, मल्लेवाडी, एरंडोली, शिपूर, बेळंकी, संतोषवाडी, जानराववाडी, सलगरे, चाबुकस्वार—वाडी, खंडेराजुरी, डोंगरवाडी, कदमवाडी, गुंडेवाडी या गावांना अंतर्गत मार्गांनी जोडणाऱ्या रस्त्यांची तर बिकट अवस्था झाली आहे. मिरज पूर्व भाग आता पाण्यासोबत रस्त्यांसाठीही आक्रमक होत आहे. त्यातूनच या भागातील ग्रामस्थ आणि प्रवासी ‘कुठे गेले सुरेश खाडे?’ असा सवाल करत आहेत. (वार्ताहर)
श्रेय घेण्यासाठी पुढे
मिरज पूर्व भागातील मिरज ते बेडग या रस्त्यासाठी सहा कोटी, लिंगनूर ते खटावसाठी १.२० कोटी, सलगरे ते बेळंकी रस्त्यासाठी तीन कोटी व उर्वरित मिरज ते लिंगनूरमार्गे बेळंकी व मिरज ते सलगरेसाठी १७ कोटींचा निधी मंजूर असल्याचे पत्र शासनाकडून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी प्राप्त केले. मात्र या निधीची मंजुरी येताच श्रेय घेण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश खाडेही पुढे आले. पाच वर्षांत अपयशी ठरलेल्या, मात्र आता श्रेयवादासाठी पुढे येणाऱ्या लोकप्रतिनिधींचे करायचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Where did Suresh Khade go? - Panchanama MLAs