चाके थांबली, जगायचे कसे? स्कूलबस चालकांपुढे जीवन-मरणाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:32+5:302021-05-19T04:26:32+5:30
फोटो १८ तारखेला नावावर सेव्ह आहेत लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या सव्वा वर्षापासून शाळा कुलूपबंद असल्याने त्यावर आधारित ...

चाके थांबली, जगायचे कसे? स्कूलबस चालकांपुढे जीवन-मरणाचा प्रश्न
फोटो १८ तारखेला नावावर सेव्ह आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या सव्वा वर्षापासून शाळा कुलूपबंद असल्याने त्यावर आधारित अर्थचक्रही थंडावले आहे. सर्वाधिक फटका स्कूलबस व्यावसायिकांना बसला आहे. बसची चाके थंडावल्याने चालकांनी जगण्याचे अन्य मार्ग पत्करले आहेत.
जिल्ह्यात सुमारे १८० स्कूल बस धावतात. त्यावर काम करणारे सुमारे २५० चालक एका फटक्यात बेरोजगार झाले आहेत. बस एकाच जागी थांबून आहेत. सुरुवातीचे काही महिने मालकांनी अर्धा पगार देऊन चालकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली; पण लॉकडाऊन लांबतच गेल्याने हा मार्गही थांबला. बसमालकांना बँकेचे हप्ते, आरटीओचे कर आदी खर्च वाढल्याने चालकांचे वेतन थांबले. त्यामुळे अनेक चालकांनी पर्यायी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागले आहेत. सामान्यत: चालक म्हणून काम करणाऱ्या या तरुणांना अन्य रोजंदारी कामे जमत नाहीत. त्यामुळे पर्यायी मार्ग शोधताना त्यांनी वाहनांवरील रोजगारालाच पसंती दिली आहे.
कोरोना काळात रुग्णवाहिकांची चलती असल्याने अनेकांनी त्यावर चालक म्हणून काम स्वीकारले. सांगलीत सध्या किमान पन्नासच्या वर स्कूलबस चालक रुग्णवाहिकांवर काम करताहेत. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. औद्योगिक वसाहतीत अत्यावश्यक उद्योग सुरू आहेत. तेथील परप्रांतीय कामगार निघून गेल्याने मनुष्यबळाची चणचण आहे. अशा कामांवर स्कूलबस चालकांनी रोजगार स्वीकारला आहे. काहींनी चक्क रुग्णालयातच जमेल ती कामे पत्करली आहेत. काही चालकांनी भाजीपाला विक्री सुुरू केली, तर काहींनी छोट्या-मोठ्या दुकानांत सेल्समन म्हणून कामे स्वीकारली. सध्या कडक लॉकडाऊनमुळे हे व्यवसायदेखील बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक जण शेतात घाम गाळून घरखर्चापुरते उत्पन्न मिळवताहेत.
पॉइंटर्स
- जिल्ह्यातील एकूण स्कूलबस - १८०
- चालक - २४०
- किती मुले स्कूलबसने प्रवास करायची? - ७०००
बॉक्स
आर्थिक गणित कोलमडले
गाड्या दारातच थांबल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. बँकांचे हप्ते, आरटीओचा करभरणा याचा मोठा डोंगर आहे. अनेक शाळांकडूनही बिले थकली आहेत. कोरोनाची लाट कधी संपेल याची निश्चिती नसल्याने चिंताजनक स्थिती आहे. शिल्लक पैशांवर कुटुंबाचा चरितार्थ सुरू आहे. स्कूलबस व्यावसायिक व चालकांना मदतीसाठी शासनाने धोरण तयार करायला हवे. किमान काही करांमध्ये सूट द्यायला हवी. मालक व चालक संघटित नसल्याने शासनावर दबाव टाकण्यात अपयशी ठरलो आहोत. अनेक चालक निराशेच्या गर्तेत आहेत. या स्थितीत स्थानिक प्रशासनाने दिलासा द्यायला हवा.
- बलवंत कांबळे, मिरज, कुपवाड
रोजगाराचे अन्य सर्वच मार्ग खुंटले
सुरुवातीला काही दिवस मालकाकडून अर्धे वेतन मिळाल्याने उदरनिर्वाह चालला; पण लॉकडाऊन वाढत गेल्याने ही मदतदेखील खुंटली. त्यामुळे सध्या अन्य खासगी वाहनावर काम करत आहे. घरात पत्नी, मुले, आई-वडील असे कुटुंब आहे. मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर गाडा रेटत आहे. रोजगाराचे सर्वच मार्ग बंद आहेत. सध्या कडक लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने तेथील रोजगारही बंद झाला आहे. रिक्षाचालकांना मदत करणाऱ्या शासनाने स्कूलबस चालकांचाही विचार करायला हवा. किमान चरितार्थापुरती मदत केली पाहिजे.
- राकेश जाधव, मालगाव
शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा
स्कूलबसवर चालक म्हणून काम करताना आयुष्यात प्रथमच इतके गंभीर संकट ओढवले आहे. सगळेच संकटात सापडल्याने मदत कोणाकडे मागायची? हा प्रश्न आहे. दुकाने, संस्था बंद असल्याने अन्यत्र काम उपलब्ध नाही. व्यवसाय करायचा तर त्यांनाही लॉकडाऊन लागू आहे. शिल्लक पैशांतून काही दिवस घर चालविले; पण असे किती दिवस चालणार? हे कळत नाही. सध्या शेतात काम करून घर चालवत आहे. शासनाने मदतीसाठी निर्णय घेतला पाहिजे.
- बाळासाहेब तनंगे, मिरज
बेरोजगार चालकांना वाऱ्यावर सोडू नका
बस थांबल्याने आमचे कुटुंबही थाबंले आहे. सगळे शेजारी-पाजारी कोरोनाच्या संकटात असल्याने मदत कोणाकडे मागायची? असा प्रश्न आहे. लॉकडाऊन शिथिल झाले तरी शाळा सुरू झाल्या नाहीत, त्यामुळे गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचे काम पत्करले. माझ्यासारखे अनेक चालक सध्या बेरोजगार आहेत. याचा शासनाने विचार करायला हवा. शासनाने बांधकाम मजुरांसह अनेक घटकांना मदत जाहीर केली, स्कूलबस चालकांना मात्र वाऱ्यावर सोडले.
- अर्शद मुजावर, मिरज
भरतीमध्ये चालक म्हणून संधी द्या
बस बंद झाल्यानंतर अन्य काही वाहनांवर काम मिळविण्याचा प्रयत्न केला; पण सध्या लॉकडाऊनमुळे सारीच वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे गावाकडे परतलो. वर्षभरापासून शेतात काम करत आहे. त्यातून कुटुंबाचा गाडा चालविण्यापुरते उत्पन्न मिळवत आहे. लॉकडाऊन कधी संपणार? याची प्रतीक्षा आहे. शासनाच्या दप्तरात स्कूलबसचालकाचा कोठेच समावेश नाही. आम्ही उत्तम दर्जाचे चालक असल्याने शासनाने भरतीमध्ये प्रधान्य द्यायला हवे. सध्याच्या कोविड काळातील कंत्राटी भरतीत चालक म्हणून संधी दिली पाहिजे.
- सतीश गावडे, कुरुंदवाड
बॉक्स
शासनाने दखल घ्यावी
- शासनाने रिक्षा चालकांना आर्थिक मदत केली, तशीच स्कूलबस चालकांनाही मदत करायला हवी.
- शासनाच्या विविध विभागांतील वाहनांवर कोरोनाकाळात तात्पुरती भरती सुरू आहे, त्यामध्ये स्कूलबस चालकांना संधी द्यावी.
- अनेक स्कूलबस चालक चांगल्या शैक्षणिक पात्रतेचे आहेत. त्यांना शिक्षणानुसार कंत्राटी भरतीमध्ये प्राधान्य द्यावे.
- स्कूलबसचे विविध शासकीय कर माफ करावेत. कर्जाच्या हप्त्यांना स्थगितीसाठी बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात.