राष्ट्रवादीविरोधी आघाडीसाठी भाजपने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:09+5:302021-08-18T04:32:09+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा-शिराळ्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे, तर भाजपमधून काहीजण बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. ...

राष्ट्रवादीविरोधी आघाडीसाठी भाजपने कसली कंबर
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा-शिराळ्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे, तर भाजपमधून काहीजण बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेनेचा एकखांबी तंबू आहे. ही परिस्थिती पाहून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीविरोधी सर्व घटकांना एकत्र घेऊन आघाडी करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत.
विधानभेच्या इस्लामपूर मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रवादीसोबत सख्य नाही. भाजपमध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पक्षप्रतोद विक्रम पाटील, राहुल महाडिक, वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील चार गट कार्यरत आहेत. त्यातच भाजपसोबत असलेल्या आ. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा सवतासुभा आहे. शिवसेनेत गेलेले गौरव नायकवडी यांचा तेथे प्रभाव नाही. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचेच एकमुखी नेतृत्व आहे. आता राष्ट्रवादीवरोधात या सर्व पक्षांना एकत्रित आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
शिराळा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या गटाची ताकद मोठी होती; परंतु विधानसभा निवडणुकीपासून त्यांचा गट पिछाडीवर आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सत्यजित देशमुख यांच्या गटामुळे नाईक गट प्रबळ होईल, असे वाटत असतानाच विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीने शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला. आता महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला उभारी आली आहे; परंतु पक्षात अंतर्गत संघर्ष आहे. त्यामुळे भाजपमधील काहीजण बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.
इस्लामपूर मतदारसंघात नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक, पालिकेतील पक्षप्रतोद विक्रम पाटील बूथ कमिट्यांची बांधणी करत आहेत. या तिघांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप पक्षीय पातळीवर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित पुढे येतो. राज्यात महाआघाडीमध्ये शिवसेना सामील असल्याने स्थानिक पातळीवर शिवसेनेची भूमिका राष्ट्रवादीविरोधी असणार का, हाही प्रश्न उपस्थित होणार आहे. असे असले तरी राष्ट्रवादीविरोधी आघाडीसाठी भाजपने कंबर कसली आहे.
कोट
आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांना एकत्र आणून राष्ट्रवादी विरोधात मोर्चेबांधणी करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचीच सत्ता येईल.
- सम्राट महाडिक, राज्य कार्यकारिणी सदस्य, भाजप.