आठवडे बाजार बंदीविरोधात प्रतिकात्मक भाजी विक्री आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:02 IST2021-03-30T19:02:06+5:302021-03-30T19:02:51+5:30
CoronaVirus Market Sangli- आठवडे बाजार बंदीविरोधात विश्रामबाग येथील आठवडा बाजारात प्रतिकात्मक भाजी विक्री करीत भाजीपाला विक्रेत्यांनी शिमगा आंदोलन केले.

आठवडे बाजार बंदीविरोधात प्रतिकात्मक भाजी विक्री आंदोलन
सुरेंद्र दुपटे
संजयनगर/सांगली : आठवडे बाजार बंदीविरोधात विश्रामबाग येथील आठवडा बाजारात प्रतिकात्मक भाजी विक्री करीत भाजीपाला विक्रेत्यांनी शिमगा आंदोलन केले.
भाजीपाला विक्रेत्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आठवडे बाजार बंदीविरोधात आपल्यावर केलेल्या अन्यायाचा निषेध म्हणून शिमगा आंदोलन केले. जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर, उपाध्यक्ष कैस अलगुर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, सचिव अजित राजोबा, लताताई पाटील, लताताई दुधाळ, प्रशांत शिकलगार, शंकर चांदकवठे आणि इतर संचालकांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजीपाला विक्रेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
सर्व भाजीपाला विक्रेते विश्रामबाग बाजारातील आपापल्या जागेवर पथारी पसरून बसून होते. समोर भाजीपाला न घेता दोन विक्रेत्यांमध्ये अंतर राखून बसल्या जागीच मास्क परिधान केलेल्या विक्रेत्यांनी शंखध्वनी करून आठवडा बाजार बंदचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आसपासचा कचरा आणि जळण गोळा करून होळी करत आठवडे बाजार बंदीविरोधात निषेध केला.
शंभूराज काटकर म्हणाले, शहरातील सर्व मॉल सुरू आहेत, ठराविक बाजार सुरू ठेवले आहेत. आठवडा बाजार तेवढेच बंद केल्याने संपूर्ण शहरातील ग्राहक सांगलीत गर्दी करू लागले आहेत. प्रशासनाचा गर्दी कमी करण्याचा हेतू त्यामुळे फसला आहे. विज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यासाठी यंत्रणा तगादा लावत असताना बेरोजगार भाजीपाला विक्रेता जगणार कसा आणि देनी भागवणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोकळ्या रस्त्यावर सरकारचे सगळे नियम पाळून आमचे भाजीपाला व्यापारी आज केवळ पथारी टाकून भाजी न घेता दोन विक्रेत्यांमध्ये अंतर राखून बसून राहिले. बाजार ही संपूर्ण शहराची गरज आहे. सर्व बाजार नियम पाळून सुरू ठेवणे शक्य आहे. गर्दी न होता आणि लोकांना कोणताही त्रास न होता आम्ही हे घडवून दाखवू शकतो हे प्रशासनाला सांगितले आहे. ते सांगतील त्या बाजारात आम्ही प्रात्यक्षिक घडवू शकतो. मात्र त्यासाठी बंदी निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे. या धोरणाने भाजीपाला विक्रेत्यांना शिमगा करावा लागणार आहे याची जाणीव व्हावी म्हणून आज जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटनेने शिमगा आंदोलन केले. प्रशासनाने आपली भूमिका बदलावी अशी आम्ही मागणी करत आहोत,
- शंभूराज काटकर,
जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटना, विश्रामबाग.