पाणीपट्टी भरतो; पण ‘डोंगरवाडी’ सुरू करा

By Admin | Updated: August 20, 2015 22:50 IST2015-08-20T22:50:59+5:302015-08-20T22:50:59+5:30

शेतकऱ्यांची कळकळीची मागणी : सोनीत आवर्तनाच्या नियोजनासाठी बैठक

The water tank is full; But start 'dongarwadi' | पाणीपट्टी भरतो; पण ‘डोंगरवाडी’ सुरू करा

पाणीपट्टी भरतो; पण ‘डोंगरवाडी’ सुरू करा

सोनी : डोंगरवाडी योजनेची पाणीपट्टी २५ आॅगस्टपर्यंत भरतो; पण शेतीला पाणी दिले तरच द्राक्षबागांची छाटणी घेणे शक्य आहे अन्यथा पाण्यावाचून करपलेली पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल, अशी कळकळीची मागणी शेतकऱ्यांनी सोनी (ता. मिरज) येथे डोंगरवाडी योजनेच्या पाणीपट्टी भरणे व पुढील आवर्तनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत केली.
म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून सोनीसह लाभक्षेत्रातील २२ गावांना पाणी सोडले जाते; पण विजबिल थकित असल्याने सध्या योजना बंदच आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके वाळली आहेत. परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठे आहे. आता माल छाटणी घेण्याची वेळ आली आहे, पण बोअर, विहिरीला पाणी कमी असल्याने छाटणी घेणे अशक्य आहे. त्यासाठी डोंगरवाडी योजनेतून पाणी सुटले तर, परिसरातील द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
ग्रामपंचायतीने गावासह वाडी-वस्तीवर ध्वनिक्षेपक लावून बैठकीची माहिती दिल्याने मोठ्याप्रमाणात शेतकरीवर्ग बैठकीला हजर होता. द्राक्षबागा जगवण्यासाठी एका टॅँकरला १५०० रुपये मोजले आहेत. पाण्याची किंमत चांगली माहीत असल्यामुळे आम्ही येत्या २५ आॅगस्टपर्यंत एक एकरला १००० रुपयेप्रमाणे पैसे भरतो, पण पाणी लवकर सोडा, अशी मागणी केली.
यावेळी जि. प. सदस्य राजेंद्र माळी, बाजार समितीचे संचालक दिनकर पाटील, सरपंच शामजी ढोबळे, संघर्ष समितीचे अरविंद पाटील, सुरेश मुळीक, गजानन पाटील यांच्यासह पाटबंधारे विभागाचे एस. डी. शिंत्रे व एम. एच. चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर)



ज्या गावांची पाणीपट्टी, त्याच गावांना पाणी
डोंगरवाडी योजना पाईपलाईन टाकून केली असल्याने ज्या गावातील पाणीपट्टी भरली जाते, त्याच गावाला पाणी सोडता येते. त्यामुळे पाणीपट्टी न भरणाऱ्या गावांना याचा फायदा होणार नसून, नियमित पाणीपट्टी भरणारी गावे किंवा वाडी-वस्तीला याचा लाभ होणार असल्याने पाणीपट्टी भरणे अनिवार्य आहे, असे सांगण्यात आले.

Web Title: The water tank is full; But start 'dongarwadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.