जिगरबाज कर्मचाऱ्यांमुळे विट्याचा पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:14+5:302021-04-18T04:25:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारी घोगाव योजना २२ वर्षांची जुनी आहे. त्यामुळे जलवाहिन्या कमकुवत ...

जिगरबाज कर्मचाऱ्यांमुळे विट्याचा पाणीपुरवठा सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारी घोगाव योजना २२ वर्षांची जुनी आहे. त्यामुळे जलवाहिन्या कमकुवत झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. दोन दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून दुधोंडीजवळ जलवाहिनीची दुरुस्ती केली. या जिगरबाज कर्मचाऱ्यांमुळे पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे प्रतिपादन माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी केले.
घोगाव योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत होता. पालिका कर्मचाऱ्यांनी जलवाहिनी काढून त्या ठिकाणी नवीन वाहिनी बसवून पाणीपुरवठा सुरळीत केला. रात्रभर जागून कर्तव्य बजावलेल्या या कर्मचाऱ्यांचा माजी आ. पाटील यांच्याहस्ते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
वैभव पाटील म्हणाले, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी कर्तव्यनिष्ठ आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.
अनिल पवार, आप्पा पाटील, मल्हारी खिलारी, सुरेश भंडारे, राजेंद्र चिरमे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक किरण तारळेकर, प्रशांत कांबळे, आदी उपस्थित होते.