शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या सहा महिन्यांत १२ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा अडीच टीएमसीने जादा आहे.चांदोली धरणातून फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १३७१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात कॅनॉलमध्ये १८५ तर नदीत ११९१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता असून २२.३२ टीएमसी( ६४.८८ टक्के) तसेच उपयुक्त साठा १५.४४ टीएमसी (५६.१० टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या सहा महिन्यांत १२ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी हा साठा १२.८३ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी २.६१ टीएमसी साठा जादा आहे. बाष्पीभवन होण्याचाही वेग वाढला आहे.मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे. तसेच औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी, अशी मागणी होत आहे.मोरणा धरणात ३७ टक्के, गिरजवडे ६० टक्के, करमजाई ९४ टक्के, अंत्री खुर्द १९ टक्के, शिवणी २३ टक्के, टाकवे ३७ टक्के, कार्वे १७ टक्के व रेठरे धरण १९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.बारा पाझर तलाव कोरडे पडले आहेत. तर ११ तलावांत २५ टक्के, १० तलावांत २६ ते ५० टक्के, १२ तलावांत ५१ ते ७५ टक्के, ४ तलावांत ७६ ते ९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ३३० कूपनलिकांची पाणी पातळी घटत आहे.
आजची स्थिती
- धरण पाणीसाठा- २२.३२ टीएमसी (६४.८८ टक्के),
- उपयुक्त पाणीसाठा- १५.४४ टीएमसी (५६.१० टक्के),
- एकूण पाऊस- ४००१ मिलिमीटर,
- वीजनिर्मिती केंद्रातून- १३७६ क्युसेक यातील कालव्यातून - १८५ क्युसेक,
- नदीपात्रात - ११९१ क्युसेक
कोरडे झालेले तलाव - हातेगाव (अंबाबाईवाडी), शिरसी (गिरजवडे रोड), शिरसी (काळे खिंड), शिरसी (कासारदरा), पाचुंब्री, करमाळे नंबर १, शिवारवाडी, भैरववाडी, निगडी जुना (कासारदरा), निगडी (खोकड दरा), इंग्रुळ, सावंतवाडी