जिल्ह्यामधील दारू तस्करांवर ‘वॉच’

By Admin | Updated: December 26, 2014 00:09 IST2014-12-25T23:14:07+5:302014-12-26T00:09:35+5:30

प्रकाश गोसावी : चार भरारी पथकांची नियुक्ती; रेल्वे, एसटी बसेसचीही तपासणी

'Watch' on liquor smugglers in district | जिल्ह्यामधील दारू तस्करांवर ‘वॉच’

जिल्ह्यामधील दारू तस्करांवर ‘वॉच’

सांगली : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गोवा आणि कर्नाटकातील अवैध दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. ही तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात चार भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी दिली. रेल्वे आणि एसटी बसेसचीही तपासणी करण्यात येत असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी व गस्त राबविली जात आहे. आतापर्यंत डफळापूर, शिगाव, कुमठे फाटा, कर्नाळ, सांगली येथे छापा टाकून अवैध दारू साठा जप्त करून संशयितांना अटक केली आहे. गोवा व कर्नाटकातील महसूल चुकवून थर्टी फर्स्टलाही दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. आता यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. तिथेही चोरून दारूची विक्री होण्याची शक्यता आहे. हे प्रकार रोखण्यासाठी चार भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पथकांमार्फत माहिती घेऊन कारवाईचे काम सुरू आहे.
ते म्हणाले की, ३१ डिसेंबरला परमिट रूम, बिअरबार व देशी दारूची दुकाने कितीपर्यंत सुरू ठेवायची, याचा अद्याप आदेश आलेला नाही. तो पुढील आठवड्यात येईल. मद्य पिणाऱ्या ग्राहकांनी त्यादिवशी रितसर परवाना घ्यावा. सर्व दुकानात परवाना देण्याची सोय केली आहे. विदेशी दारूसाठी पाच रुपये, तर देशी दारू पिण्यासाठी दोन रुपये, असा परवान्याचा दर ठेवण्यात आला आहे.
गोवा, कर्नाटकातून येणाऱ्या एसटी बस व रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची तपासणी केली जात आहे. स्वस्तात दारू मिळते म्हणून प्रवाशांसह काही तस्कर तेथून दारू घेऊन येतात, अशा तक्रारी असल्याने ही तपासणी मोहीम सुरू आहे. (प्रतिनिधी)

पार्टीसाठी परवान्याचे बंधन
गोसावी म्हणाले की, थर्टी फर्स्टसाजरा करण्यासाठी स्वतंत्र पार्टीचे आयोजन केले जात असेल, तर यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना घेणे आवश्यक आहे. एक दिवसाच्या पार्टीसाठी १२ हजार ५०० रुपये परवाना शुल्क आहे. परवाना न घेताच पार्टी साजरी केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल.

Web Title: 'Watch' on liquor smugglers in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.