सर्वसाधारण सभेसाठी सभागृहातच ठिय्या मारण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:34+5:302021-06-21T04:18:34+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या सोमवारी (दि. २१) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी रंगीत तालीम रविवारी झाली. फक्त सोळा सदस्य त्यामध्ये सहभागी ...

सर्वसाधारण सभेसाठी सभागृहातच ठिय्या मारण्याचा इशारा
सांगली : जिल्हा परिषदेच्या सोमवारी (दि. २१) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी रंगीत तालीम रविवारी झाली. फक्त सोळा सदस्य त्यामध्ये सहभागी झाले. दरम्यान, उद्याची सभा ऑनलाईन घेण्याला बहुतांश सदस्यांनी विरोध दर्शविला असून, सभागृहात ठिय्या मारण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेची सभा सोमवारी होणार आहे. ती प्रत्यक्ष सभागृहात घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामुळे परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ऑनलाईन स्वरुपात होईल. त्याची चाचणी रविवारी झाली. ६० सदस्य व १० सभापतींशी संपर्क साधण्यात आला. सोयीनुसार त्यांच्या घरामध्ये, ग्रामपंचायतीत किंवा पंचायत समितीत संपर्काची व्यवस्था करून देण्यात आली. संबंधित ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षातील कर्मचाऱ्याने तांत्रिक जोडण्या करून दिल्या. व्हिडिओ आणि ऑडिओची चाचणी घेण्यात आली. त्याच्याआधारे आता सोमवारी प्रत्यक्ष सभा होईल.
आज चाचणीसाठी सर्व सदस्यांना व सभापतींना संपर्क करण्यात आला; पण अनेकांनी प्रतिसाद दिला नाही. रंगीत तालमीमध्ये फक्त १६ सदस्य सहभागी झाले. जिल्हा परिषदेतून अध्यक्षा प्राजक्ता कोरे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी त्यांच्याशी संपर्क केला.
कोरे यांनी सांगितले की, सोमवारच्या सभेसाठी सर्व सज्जता केली आहे. नेटवर्क किंवा बॅटरी बॅकअपची समस्या येऊ नये यासाठी प्रत्येक सदस्याकडे दोन मोबाईलची सोय केली आहे. त्याशिवाय संगणक, लॅपटॉपसाठी इन्व्हर्टरची सोय करण्यास ग्रामसेवकांना सांगितले आहे. सभा कितीही वेळ चालली तरी संपर्क कायम राहावा याची खबरदारी घेतली आहे. सभेदरम्यान सर्व अधिकारी जिल्हा परिषदेत त्यांच्या कार्यालयात ऑनलाईन उपस्थित असतील. प्रत्येक सदस्याच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देतील. गावामध्ये सदस्यांच्या चहा, नाश्ता व जेवणाचीही सोय केली आहे.
चौकट -
सभा ऑनलाईन, सदस्य मात्र सभागृहात
सभा ऑनलाईन होणार असली तरी अनेक सदस्यांनी प्रत्यक्ष सभागृहातच सभेसाठी उपस्थित राहण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधकांसह खुद्द भाजपच्यादेखील काही सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे उद्या जिल्हा परिषदेत रणसंग्राम पेटण्याची चिन्हे आहेत. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सभागृहातील सदस्यांना तोंड देताना प्रशासनाचीही कसरत होणार आहे.