जनगणना करायची आहे? शौचालयाचे सर्वेक्षण करायचे आहे? : गुरुजी रिकामे आहेतच की!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:27+5:302021-02-05T07:32:27+5:30
सांगली : शिकविणे सोडून सारे काही करतो तो शिक्षक, अशी शिक्षकाची आधुनिक व्याख्या येत्या काही वर्षांत प्रचलित झाल्यास नवल ...

जनगणना करायची आहे? शौचालयाचे सर्वेक्षण करायचे आहे? : गुरुजी रिकामे आहेतच की!
सांगली : शिकविणे सोडून सारे काही करतो तो शिक्षक, अशी शिक्षकाची आधुनिक व्याख्या येत्या काही वर्षांत प्रचलित झाल्यास नवल नसावे. प्राथमिक शिक्षकांवर सरकारकडून लादली जाणारी हरतऱ्हेची कामे पाहता लवकरच ही स्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुरुजींकडून करून घेतल्या जाणाऱ्या कामांची यादी जणू न संपणारी आहे. किंबहुना दरवर्षी ती वाढतच रहाते. सरकारी कामांमुळे ते इतके कौशल्य पारंगत झालेत की, विद्यार्थ्यांना शिकवावेदेखील लागते हेच विसरून गेले आहेत. पोषण आहाराचे ओझे मानगुटीवरून उतरण्याचे नाव घेत नाही. किंबहुना आजवर अनेक शिक्षकांना आहारातील गोंधळामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे. मुलांना आहार देण्याआधी तो गुरुजींना पहिल्यांदा खाऊन बघावा लागतो. मीठ-मिरची कमी असेल तर ठेकेदाराला जाब विचारावा लागतो. तो ठेकेदार एखाद्या पुढाऱ्याचा चेला असेल तर पुढाऱ्याच्या शिव्याही खाव्या लागतात.
कोरोनाकाळात गुरुजींना सरकारने मारून मुटकून कोरोनायोद्धे बनविले. घरोघरी फिरविले. लोकांची आरोग्य तपासणी करायला लावली. एखादा चुकार माणूस कोरोना विषाणू काखोटीला मारून गावात येऊ नये यासाठी गुरुजींना सीमेवरच्या तपासणी नाक्यांवर बसविले. अशाने गुरुजी म्हणजे अर्धा पोलीस आणि अर्धा होमगार्ड ठरले. मूळ गुरुजीपण कोठे हरविले त्यांनाही समजले नाही. जत भागात तर एका शिक्षकाने ड्यूटी बजावताना वाहनाच्या धडकेत जीवही गमावला.
चौकट
तुम्हीच नाचा, तुम्हीच टाळ्या वाजवा
एकशिक्षकी शाळांतील गुरुजींचे हाल तर सर्वांत वाईट. जणू एकपात्री प्रयोगच. मुले गोळा करण्यापासून शाळा झाडण्यापर्यंत सगळ्या कामांचा मालक एकटाच. कोरोनाकाळात वाडी-वस्तीवर उन्हातान्हात फिरून लोकांच्या शरीराचे तापमान तपासताना गुरुजींचा पारा कधी चढला हे समजलेच नाही. तालुक्याला मिटिंगला बोलविले जाते तेव्हा तर शाळेला वालीच राहत नाही.
चौकट
सरकारी कामाच्या ओझ्याने गुरुजी दबले
- जनगणना, मतदार नोंदणी, मतदान, मतमोजणी या राष्ट्रीय कामांसाठी तर शिक्षक हक्काचा. अशावेळी शिकविण्याचे काम आपोआपच अराष्ट्रीय ठरून जाते. मध्यंतरी एकदा तर घरोघरी शौचालय मोहिमेत शौचालयांचे सर्वेक्षणही करायला लावले होते.
- आता नव्याने शाळा सुरू झाल्यावर प्रत्येक मुलाचे तापमान तपासणे. त्याच्या नोंदी ठेवणे, ऑनलाइन माहिती भरणे ही आणखी जादाची कामे उरावर बसली आहेत.
- वर्गखोल्यांचे बांधकाम होते तेव्हा मुख्याध्यापकांना बांधकाम सुपरवायझरची भूमिका बजावावी लागते. कामाची गुणवत्ता तपासून तसे प्रमाणपत्र द्यावे लागते. काही उणीव राहिलीच तर त्याचा जाबही त्यांनाच विचारला जातो.
पाइंटर्स
- जिल्हा परिषदेच्या शाळा : १६८८
- शिक्षकसंख्या : ५८८९
- विद्यार्थी संख्या - १,१७,१४५
कोट
शिक्षकांना शिकवू द्या ही मागणी आम्ही वर्षानुवर्षे शासनाकडे करत आहोत. शिक्षणाचा काहीही संबंध नसलेल्या कामांच्या ढिगाऱ्यात शिक्षक हरवून गेला आहे. यातूनही गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी जोखमीची ठरत आहे. सरकारी पातळीवर याचा गांभीर्याने विचार कधीतरी होणार की नाही असा आमचा प्रश्न आहे.
- किरण गायकवाड, माजी कोषाध्यक्ष, शिक्षक समिती, महाराष्ट्र
- सरकारी आदेशानुसार शिक्षकांवर राष्ट्रीय कामे सोपविली जातात. जनगणना, मतदार नोंदणी या राष्ट्रीय कामांत त्यांचा सहभाग अपेक्षित आहे. जिल्हा परिषद स्तरावर त्यांना कमीत कमी अशैक्षणिक कामे लावण्याचा प्रयत्न असतो.
- राहुल गावडे, प्रभारी शिक्षणाधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी