सात गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती

By Admin | Updated: December 29, 2014 23:43 IST2014-12-29T23:19:40+5:302014-12-29T23:43:55+5:30

माधवनगर पाणी योजना : पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त; ग्रामस्थांमध्ये संताप

Wandering water in seven villages | सात गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती

सात गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती

सांगली : थकित बिलापोटी महावितरणने वीज कनेक्शन तोडल्याने मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. विधानसभा निवडणूक आली की, सातही गावात संपर्क ठेवणाऱ्या व निवडणुका झाल्या की गायब होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांना प्यायला पाणीही मिळेनासे झाले आहे. ऐन थंडीत ग्रामस्थांना पहाटे उठून विहीर व कूपनलिकेतून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहेत.
मुळातच माधवनगरसह सात गावांची पाणी योजना सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली आहे. महिन्यातून केवळ चार ते पाचवेळा या गावात पाणी येते. अनेकदा गळतीमुळे महिन्यातून केवळ दोनच वेळा पाणी येते. तेही केवळ अर्धा-पाऊण तासच असते. महिन्यापूर्वी थकबाकीमुळे वीज पुरवठा तोडण्यात आला होता. त्यावेळी तब्बल दहा दिवस पाणी सोडण्यात आले नव्हते.
माधवनगर ग्रामपंचायतीने वीज बिलाची रक्कम वेळेत भरूनही इतर ग्रामपंचायतींची थकबाकी असल्याने माधवनगर पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे विशेषत: माधवनगर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यामुळे काही ग्रामपंचायतींनी युद्धपातळीवर वसुली करून महावितरणकडे वीज बिलाची थकबाकी भरली होती. यावेळी आता पुन्हा थकबाकीचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही.
लाखो रुपयांची थकबाकी असली तरी, काही ग्रामपंचायतीकडून वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. शिवाय महिन्यातून दोन ते तीन वेळाच पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थही पाणी बिल भरण्यास पुढे येत नाहीत.
ग्रामपंचायतींकडून सध्या वसुली सुरु असली तरी, ती समाधानकारक नाही. महावितरणचे दोन कर्मचारी प्रत्येक महिन्यातील या गावातील वीज बिलांची शंभर टक्के वसुली करतात. हे कर्मचारी तर परगावचे आहेत.
मात्र गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्य गावचे, कर्मचारी गावचे, मग त्यांना पाणी बिलाची शंभर टक्के का वसुली होत नाही, असा सवाल सातही गावातील ग्रामस्थांमधून होत
आहे.
पाणीपट्टी वसुलीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. मनात येईल त्या प्रभागात वसुलीला जायचे. दिवसभरात पाच हजाराचीही वसुली होत नाही, अशी परिस्थिती काही ग्रामपंचायतींची आहे. सध्या पाणी नसल्याने ग्रामस्थ ऐन थंडीत मिळेल तेथून पाणी आणत आहेत. मात्र प्यायला पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. (प्रतिनिधी)


लोकप्रतिनिधी गेले कुठे?
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढविणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले? कोट्यवधींची कामे केल्याचा डांगोरा पिटणारे लोकप्रतिनिधी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत:च्या फंडातील निधी का देत नाहीत? निवडणुका झाल्यानंतर पुन्हा गावाकडे का फिरकत नाहीत? असा सवाल सातही गावांतील ग्रामस्थ करत आहेत.

Web Title: Wandering water in seven villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.