आयटीआय प्रवेशासाठी प्रतीक्षा सीईटी परीक्षेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:10+5:302021-07-27T04:28:10+5:30
संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीचा निकाल लागून आठवडा लोटला तरी आयटीआय प्रवेशाविषयीची अनिश्चितता कायम आहे. शासनाच्या ...

आयटीआय प्रवेशासाठी प्रतीक्षा सीईटी परीक्षेची
संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहावीचा निकाल लागून आठवडा लोटला तरी आयटीआय प्रवेशाविषयीची अनिश्चितता कायम आहे. शासनाच्या निर्देशानुसार सध्या ऑनलाईन स्वरूपात नोंदणी सुरू असली तरी प्रवेशाची निश्चिती मात्र नाही.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआयची प्रवेश प्रक्रिया किंचित लवकर सुरू झाली आहे. सध्या दहावीनंतरच्या सीईटी परीक्षेची प्रतीक्षा आहे. प्रवेशासाठी दहावीच्या आसन क्रमांकाच्या आधारे ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, पण ती प्रवेशासाठी अंतिम नसेल. दहावीनंतरच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशांसाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी होणार आहे. तिचा निकाल साधारणत: ऑगस्टअखेरीस लागण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर सर्व प्रवेश प्रक्रियांना गती येईल. सीईटी सक्तीची नसली तरी बहुतांश प्रवेशांसाठी सीईटीचे मेरीटच लक्षात घेतले जाईल. त्यामुळे आयटीआयची सध्याची ऑनलाईन नोंदणी तूर्त फारशी महत्त्वाची नाही.
बॉक्स
गतवर्षी खासगीमध्ये जागा रिक्त
- गेल्यावर्षी शासकीय संस्थांमधील जागा भरल्या होत्या. खासगीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या होत्या.
- यंदाही शासकीय संस्थांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. डिप्लोमाला विद्यार्थी मिळत नसताना आयटीआय मात्र फुल्ल आहे.
- खासगी संस्थांना मात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी बरीच खटपट करावी लागत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे ओढा
- प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पायावर उभा राहता येणाऱ्या ट्रेडना विद्यार्थ्यांचे प्राधान्य आहे.
- डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, रेफ्रीजरेशन, वातानुकूलन अशा ट्रेडना चांगला प्रतिसाद आहे.
- नोकरी नाही मिळाली तरी स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल या हेतूने या ट्रेडना पसंती दिली जाते.
- शिवणकाम, गवंडीकाम, सुतारकाम हे ट्रेड तुलनेने मागास आहेत, तरीही शासकीय संस्थांत या जागा शेवटच्या टप्प्यात भरतात.
कोट
सीईटी झाली तरी आयटीआयलाच पसंती
दहावीला कितीही गुण मिळाले तरी आयटीआयमध्येच प्रवेश घेण्याचे नक्की केले होते. वडिलांचे गॅरेज असल्याने आयटीआयमधील शिक्षण फायद्याचे ठरेल. भविष्यात हाच व्यवसाय करायचा असल्याने डिझेल मेकॅनिकला पसंती आहे.
- मेहबुब शरीकमसलत, विद्यार्थी, मिरज.
आयटीआयला प्रवेश घ्यायचा असल्याने तूर्त ऑनलाईन नोंदणी केली आहे. सध्या सीईटीचा अभ्यास सुरू आहे. निकालानंतर चांगले गुण मिळाल्यास शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहे.
- शौर्य कुरणे, विद्यार्थी, सांगली
पॉईंटर्स
अर्ज स्थिती
एकूण जागा ३,७६८, आलेले अर्ज १,७५९
संस्था
शासकीय संस्था १०, खासगी संस्था १४
रिक्त जागा
शासकीय जागा २,६००
खासगी जागा १,१६८