जिल्ह्यातील ७२ संस्थांच्या मतदार याद्या नव्याने होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:53+5:302021-09-21T04:29:53+5:30
सांगली : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या मतदार याद्या पुन्हा सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. सहकार ...

जिल्ह्यातील ७२ संस्थांच्या मतदार याद्या नव्याने होणार
सांगली : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या मतदार याद्या पुन्हा सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. सहकार विभागाच्या नव्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पूर्वी झालेल्या नवीन सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे ७२ संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात लागण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या साथीमुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका दीड वर्षांपासून थांबल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाची लाट ओसरत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठविण्यात आली आहेत. ज्या सहकारी संस्थांची अर्ज विक्री सुरू होती, त्यांच्या निवडणुका तत्काळ होतील; परंतु ज्या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, त्या संस्थांकडून नव्याने प्रारूप मतदार यादी मागविण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. शासनाच्या नव्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पूर्वी जे नवे सभासद झालेले आहेत त्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांकडून नव्याने प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या १ हजार ५२८ सहकारी संस्था आहेत. जिल्हा बॅँक, पलूस व जत अर्बन बँक, तसेच विकास सोसायट्या, दूध संस्था, खरेदी विक्री संस्था व अन्य सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. जिल्हा बॅँकेची निवडणूक विभागीय सहनिबंधकांच्या अखत्यारीत आहे, तर अन्य संस्थांची निवडणूक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होणार आहे. क व ड वर्गातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया तालुका उपनिबंधकांच्या अखत्यारीत होणार आहे. शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. नामनिर्देशनपत्रांची प्रक्रिया सुरू होऊन थांबलेली एकही संस्था आपल्याकडे नाही.
सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अ वर्गातील ७२ सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. याच वर्गातील एका सहकारी बँकेवर सध्या प्रशासक असल्याने ती संस्था वगळून अन्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांकडून मतदार यादी नव्याने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.