भारती रुग्णालयाच्या दूरदृष्टीमुळे कोरोना रुग्णांचा श्वास अखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:24+5:302021-05-07T04:29:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाभरात हाहाकार उडाला आहे; पण येथील भारती रुग्णालय मात्र स्वयंपूर्णतेच्या ...

The vision of Bharati Hospital keeps the corona patients breathing | भारती रुग्णालयाच्या दूरदृष्टीमुळे कोरोना रुग्णांचा श्वास अखंड

भारती रुग्णालयाच्या दूरदृष्टीमुळे कोरोना रुग्णांचा श्वास अखंड

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाभरात हाहाकार उडाला आहे; पण येथील भारती रुग्णालय मात्र स्वयंपूर्णतेच्या जोरावर रुग्णांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरले आहे. १९ हजार लिटर क्षमतेच्या स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्पामुळे १५० खाटांच्या कोविड रुग्णालयाला अखंड ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे.

रुग्णालय व्यवस्थापनाची दूरदृष्टी, सुव्यवस्थित नियोजन आणि भविष्यकालीन काटेकोर नियोजनामुळे टंचाईच्या संकटकाळातही रुग्णालयाने कोरोनाबाधितांचे श्वास अखंड राखले आहेत. रुग्णालयाकडे गेल्या वर्षापर्यंत सहा हजार लिटरचा ऑक्सिजन टँक आणि ५० जम्बो सिलिंडर इतकीच क्षमता होती. माफक शुल्कातील उपचारांमुळे रुग्णांचा ओढा प्रचंड होता. त्यांच्यासाठी ही ऑक्सिजन क्षमता अपुरी ठरत होती. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याचे गांभीर्य ठळकपणे जाणवले.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि डॉ. अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाने प्रकल्पाच्या विस्ताराचा दूरदृष्टीचा निर्णय घेतला आणि तातडीने अंमलातही आणला. १३ हजार लिटर क्षमतेचे द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टँक उभारले. ५० जम्बो सिलिंडर वाढवून १३० पर्यंत नेले. त्यांची प्रत्येकी क्षमता ७ हजार लिटरची आहे. त्याशिवाय कोविड रुग्णालयासाठी ३० जम्बो सिलिंडरचा शिलकी साठा ठेवला. या स्वयंपूर्णतेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई वर्षभरात कधीच जाणवली नाही.

क्षमता वाढविल्याचा फायदा रुग्णालयाने अन्य गरजू रुग्णालयांनाही दिला. जिल्ह्यात पंधरवड्यापासून ऑक्सिजनची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात तर आणीबाणीची स्थिती उद्‌भवली. अनेक रुग्णालयांत तास-दोन तासांपुरताच ऑक्सिजन उपलब्ध होता. रुग्णांचे प्राण धोक्यात होतो. अशावेळी रुग्णालयाने काही खासगी रुग्णालयांना सिलिंडर पुरविले. त्यामुळे रुग्णांचे श्वास अखंड राहिले.

चौकट

ऑक्सिजन निर्मिती सुरू करणार

भारती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शहाजी देशमुख म्हणाले की, भारती रुग्णालयाकडे साठवणुकीची मोठी क्षमता निर्माण झाली असली तरी बाहेरून होणाऱ्या पुरवठ्यावरच ती अवलंबून आहे. सध्या देशभरातच मोठी टंचाईची स्थिती आहे. हे लक्षात घेऊन व्यवस्थापनाने स्वत:चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ४५ दिवसांत कार्यान्वित होईल. प्रत्येक मिनिटाला ५०० लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असेल. यानिमित्ताने रुग्णालय ऑक्सिजनबाबतीत १०० टक्के स्वयंपूर्ण होईल, शिवाय गरजेनुसार अन्य रुग्णालयांनाही पुरवू शकेल.

Web Title: The vision of Bharati Hospital keeps the corona patients breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.