सांगली : शहापूर (ठाणे) येथे झालेल्या खुल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत सांगलीच्या विश्वनाथ बकाली याने ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर नाव कोरले. तब्बल ३५ वर्षांनंतर सांगलीला हा बहुमान मिळाला. तसेच स्पर्धेत दोन सुवर्ण, गटात तृतीय, चतुर्थ क्रमांकासह सांगलीच्या खेळाडूंनी उपविजेतेपदही पटकावले.शहापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य नामांकन खुली ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत सांगली जिल्ह्याकडून आठ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत शहरी भागातील स्पर्धेत ठसा उमटवला. विश्वनाथ बकाली याने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’चा बहुमान म्हणजेच ‘महाराष्ट्र श्री’ होण्याचा बहुमान मिळवला. तब्बल तीस वर्षांनंतर सांगली जिल्ह्यातील खेळाडूने ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर नाव कोरले.
गेले एक तप जिल्ह्याचा झेंडा फडकवत शंभरहून अधिक स्पर्धा गाजवलेल्या ‘गोल्डन बॉय’ विश्वनाथ बकाली याने स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत देत मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, सोलापूरच्या खेळाडूंना चारीमुंड्या चीत करत विजय खेचून आणला.स्पर्धेत ७५ ते ८० किलो गटात दबदबा निर्माण केलेल्या आणि पस्तिशी ओलांडलेल्या अर्शद मेवेकरी याने सुवर्णपदक पटकावले. दशकभर सातत्याने सहभाग नोंदवणारा आणि ग्रामीण भागात जीम चालवणाऱ्या गौतम शिर्के यानेही गटात सुवर्णपदक पटकावले. इस्लामपूरच्या हाफीज आत्तार याने चतुर्थ क्रमांक मिळवला. ५६ किलोच्या प्रमोद सूर्यवंशी या पलूसच्या खेळाडूने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेत सांगलीला उपविजेतेपद मिळाला.
युवा खेळाडू मयूर जल्ली, आष्ट्याचा विघ्नेश देसावळे, कडेगावचा अझर शेख व जिल्ह्याची पहिली महिला खेळाडू विट्याची शुभांगी सुतार यांनी चांगली कामगिरी केली. माजी खेळाडू विवेक संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी यश मिळवले. राज्य स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जल्लोषात स्वागत झाले. यावेळी प्रशिक्षक इनायत तेरदाळकर, माजी खेळाडू शेखर खरमाटे, अमर भंडारे, राम साबळे यांच्यासह जीम ओनर संघटनेचे संघटक फिरोज शेख, श्रीकांत कुंभार, योगेश रोकडे आदी उपस्थित होते.
१९९५ नंतर सांगलीला बहुमानराज्यस्तरीय स्पर्धेत रवींद्र आरते यांनी ३० जून १९९५ला सांगलीतील पहिल्या स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री’चा बहुमान मिळवला होता. तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा हा मान म्हैसाळसारख्या ग्रामीण भागातून शहरातला स्टार जीम ट्रेनर म्हणून उपजीविका करणाऱ्या विश्वनाथ याने मिळवला.