विष्णूदास भावे गौरव पदक ही कलाकरांसाठी पोहोचपावती नीना कुळकर्णी : पालकमंत्र्यांच्याहस्ते पदक सन्मान सोहळा रंगला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 22:24 IST2025-11-05T22:23:30+5:302025-11-05T22:24:11+5:30
सांगलीतील अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत कुळकर्णी यांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले.

विष्णूदास भावे गौरव पदक ही कलाकरांसाठी पोहोचपावती नीना कुळकर्णी : पालकमंत्र्यांच्याहस्ते पदक सन्मान सोहळा रंगला
सांगली : नाटक ही सामुहिक कला आहे. ते एकटाचे काम नाही. विष्णूदास भावे गौरव पदक मिळाले, माझ्यासाठी ते प्रतिकात्मक आहे. यामागे रंगमंचावरील साऱ्यांचेच श्रेय आहे. गेली ५५ वर्षे रसिकांनी माझ्यावर प्रेम केले. ते वृद्धींगत व्हावे. हे गौरव पदक कलाकारासाठी पोहचपावती आहे, असे भावोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी काढले.
सांगलीतील अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत कुळकर्णी यांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात हा सन्मान सोहळा रंगला होता.
कुळकर्णी म्हणाल्या की, भावे गौरव पदक गळ्यात आहे. काय वाटते ते सांगू शकत नाही. अभिमान आहे, भावकू झाले. गेल्या ५५ वर्षातील रंगभूमीवरील आठवणी दाटून येत आहेत. अगदी पहिल्या नाटकपासून ते आतापर्यंतची कारकीर्द डोळ्यासमोर आहे. नाटक ही सामुहिक कला आहे. यामागे रंगमंचावरील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, बॅकग्राऊंड कलाकार यांची मेहनत असते. ही सगळी एकसंघता झाली, तरच नाटकाला रंग चढतो.
दहा वर्षानंतर मी पुन्हा रंगमंचावर पाऊल ठेवत आहे. नऊ वर्षाची असताना पहिल्यांदा काॅलनीतील नाटकात सहभाग घेतला. विजया मेहता यांनी माझ्यातील चुणूक ओळखली. त्यांच्यासोबत व्यवसायिक नाटके केली. त्यानंतर काशीनाथ घाणेकर मला नाटकासाठी घेऊन गेले. नाटक करतानाच मी पदवीधर झाले. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. रत्ना पाठक, सुनील शानभाग यांची ओळख झाली. सत्यदेव दुबे यांच्या नाट्य कार्यशाळेत गेले. अभिनेत्री व्हायचे, हे ध्येय नव्हते.
नाटक करताना भेटणारी माणसे आणि वाचनाची आवड यामुळे रंगमंचाकडे वळलो. आजसारखे तेव्हा नाट्य प्रशिक्षण नव्हते. काम करतानाच तुम्हाला शिकावे लागत होते. अगदी रंगमंचाच्या मागे कपडे इस्त्रीपासून ते दुभाषीची कामे केली. मला नाटकाची निवड आणि कामातील सातत्य हे विजयाताई व दुबे यांच्याकडे शिकता आले. हे दोघे माझ्यासाठी बलस्थाने आहेत. नाटकात काम करणे अवघड आहे. सातत्य, नाटकाची निवड आणि एकाग्रता हवी. व्यक्तीरेखाच नव्हे तर नाट्यसंहिताही बघावी लागते. आता रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळत रहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असेही कुळकर्णी म्हणाल्या.
डाॅ. जब्बार पटेल म्हणाले की, नाटकाची लय सतत बदलत असते. नाटक हे लेखकाचे तर चित्रपट हे दिग्दर्शनाचे माध्यम आहे. नाटकाला दिग्दर्शक परिभाषा देतात. त्यासाठी नाटकाच्या तालमी महत्वाचा भाग आहे. यावेळी स्वागत नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ. शरद कराळे यांनी केले. त्यांनी भावे नाट्यगृहाच्या सुधारणासाठी शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी केली. तर प्रास्ताविक प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांनी केले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष विलास गुप्ते, मेधा केळकर, विवेक देशपांडे, जगदीश कराळे, भालचंद्र चितळे, नंदकुमार जाधव, बलदेव गवळी यांच्यासह प्रेक्षक उपस्थित होते.
सांगलीत नाट्य एकांकिका स्पर्धा घेणार : पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्याच्या धर्तीवर सांगलीत अंतर्गत काॅलनी नाट्य एकाकिंका स्पर्धा घेणार आहोत. कलेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू. भावे नाट्यगृहाच्या सुधारणाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन निधीसाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच दर महिन्याला एक मोफत नाटक दाखविण्याचा उपक्रम हाती घेणार आहोत.