विष्णुदास भावे गौरव पदक अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर
By संतोष भिसे | Updated: October 17, 2023 13:41 IST2023-10-17T13:41:31+5:302023-10-17T13:41:57+5:30
सांगली : यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक प्रसिद्ध अभिनेते, नाट्यकर्मी व मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना जाहीर ...

विष्णुदास भावे गौरव पदक अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर
सांगली : यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक प्रसिद्ध अभिनेते, नाट्यकर्मी व मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना जाहीर झाले आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने सांगलीत मंगळवारी पुरस्काराची घोषणा केली. रंगभूमीदिनी, ५ नोव्हेंबररोजी सांगलीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दामले यांच्या नावाची घोषणा केली. पुरस्काराचे स्वरुप गौरव पदक, रोख २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे. पुरस्काराचे हे ५६ वे वर्ष आहे. नाट्यक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्याला दरवर्षी हे पदक दिले जाते. नाट्यक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. गतवर्षी ज्येष्ठ नाट्यकर्मी, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना पदक प्रदान करण्यात आले होते. यापूर्वी रोहिणी हट्टंगडी, मोहन आगाशे, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, निळू फुले अशा अनेकांना पुरस्कार देण्यात आला आहे.
मंगळवारी पुरस्काराची घोषणा करताना विलास गुप्ते, बलदेव गवळी, प्रसाद कुलकर्णी, मेधा केळकर, जगदीश कराळे आदी उपस्थित होते.