एसटीचे सीमोल्लंघन, प्रवासी मात्र घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST2021-07-10T04:18:35+5:302021-07-10T04:18:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. दुसऱ्या लाटेनंतर एसटीची ...

एसटीचे सीमोल्लंघन, प्रवासी मात्र घरातच!
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. दुसऱ्या लाटेनंतर एसटीची सेवा पूर्ववत सुरू झाली असली, तरी सर्वच मार्गांवर अजूनही बसेस धावत नाहीत. त्यात डिझेलचे दर दररोज वाढत चालले आहेत. त्यामुळे महामंडळाचा तोटाही वाढला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटीचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यास आणखी काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यात एकूण १० आगार आहेत. या आगारातून ७१६ बस चालविल्या जातात. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे महामंडळाचे वैभव लुप्त झाले आहे. पहिल्या लाटेनंतर काही दिवसांनी एसटीची सेवा पूर्वपदावर आली होती; पण दोन महिन्यातच पुन्हा दुसऱी लाट आली. या लाटेत मात्र महामंडळाचे मोठे नुकसान झाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा बससेवा सुरू झाली; पण ५० टक्के बसेस अजूनही बंदच आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सेवा पूर्ववत झालेली नाही. ज्या मार्गावर बससेवा सुरू आहे, तिथे प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पूर्ण क्षमतेने सेवा सुरू झाल्याशिवाय महामंडळाचे नुकसान भरून निघणार नाही. त्यात डिझेलचे दर वाढत असल्याने त्याची चिंताही महामंडळाला लागली आहे.
चौकट
२५ कोटींचा तोटा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महामंडळाला सर्वाधिक फटका बसला. विशेषत: एप्रिल, मे महिन्यात तोटा वाढला. जून महिन्याअखेरपर्यंत २५ कोटींचा तोटा झाला. बससेवा पूर्ववत सुरू झाली असली, तरी प्रवाशांची संख्या कमीच आहे. महामंडळाला किलोमीटरला ४५ ते ५० रुपयांचा खर्च येतो. पण सध्या २२ रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे तोटा वाढला असल्याचे अधिकारी सांगतात.
चौकट
दुसऱ्या राज्यात प्रवासी मिळेनात
१. सध्या जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या बसेसची संख्या कमी आहे. केवळ ७२ फेऱ्या सुरू आहेत.
२. केवळ हैदराबाद व कर्नाटक राज्यातच बससेवा सुरू केली आहे. इतर राज्यातील सेवा बंदच आहेत.
३. परराज्यातील फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांचा प्रतिसादही कमी असल्याचे अधिकारी सांगतात.
चौकट
अनेक मार्गावरील फेऱ्या अजूनही बंद
१. जिल्ह्यातील तालुका व महत्त्वाच्या गावात एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत.
२. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील फेऱ्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत.
३. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी वाहतुकीतून होणारी कमाई थांबली आहे.
४. इस्लामपूर, जत येथील बसफेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.
चौकट
पुणे, मुंबई मार्गावर प्रवाशांची गर्दीच गर्दी
१. सध्या जिल्ह्यातील दहा आगारांतून बससेवा सुरू आहे. त्यात पुणे, मुंबई व सोलापूर मार्गावरच्या बसेसमध्ये प्रवासी दिसून येतात.
२. लांबपल्ल्याच्या मार्गावरील बसमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये लग्नसराई, कोरोनामुळे परजिल्ह्यात अडकून पडलेल्या नातेवाईकांची संख्या अधिक आहे.
३. कर्नाटक व हैदराबाद या परराज्यांतील मार्गावर गर्दी आहे. दररोज ४५ हजार प्रवाशांची ये-जा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
जिल्ह्यातील एकूण आगार : १०
जिल्ह्यातील एकूण बसेस : ७१६
सध्या सुरू असलेल्या बसेस : ३८५
रोज एकूण फेऱ्या : ७५०
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस : ७२
.