विठलापूर ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:51+5:302021-06-29T04:18:51+5:30
आटपाडी : विठलापूर (ता. आटपाडी) येथील ग्रामपंचायतीने दलित वस्ती विकास योजनेच्या निधीतून पैसे खर्ची टाकले आहेत, मात्र कामे ...

विठलापूर ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन
आटपाडी : विठलापूर (ता. आटपाडी) येथील ग्रामपंचायतीने दलित वस्ती विकास योजनेच्या निधीतून पैसे खर्ची टाकले आहेत, मात्र कामे प्रत्यक्षात केली नाहीत. याची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी आटपाडीच्या पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सोमवारी धरणे आंदोलन केले.
ग्रामपंचायतीने दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत १५ टक्के फंडातून २१ हजार रुपयांची भांडी घेतल्याचे फक्त कागदोपत्री दाखवले आहे. २०१६-१७ मध्ये २१ हजार ८०० रुपये आड बुजवण्यासाठी खर्ची टाकलेले आहेत. मात्र भांडी खरेदी केल्याचे व आड बुजवण्याचे काम प्रत्यक्षात केलेले नाही. २०१८-१९ मध्ये सौरदिव्याच्या दुरुस्तीसाठी १५ हजार रुपये खर्ची टाकले आहेत. मात्र ते काम प्रत्यक्षात केलेले नाही, असे आरोप करून कारवाई करावी, अशी मागणी केली.
आंदोलनात रिपाइंचे तालुकाध्यक्ष राजेद्र खरात, दीपक सावंत, संतोष सावंत, सचिन सावंत, नवनाथ जावीर, सुभाष सावंत, नाथा सावंत, अतुल सावंत, अमित जवळे, वैशाली सावंत, साहेबराव चंदनशिवे यांनी सहभाग घेतला.
चौकट
आ. पडळकरांनी घेतली आंदोलकांची भेट
भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. जर विकास कामे न करता निधी हडप केला जात असेल, तर तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली.