विलासराव शिंदे : अजात शत्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:56+5:302021-02-15T04:23:56+5:30

विलासराव शिंदे या नावातच खरी ताकत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ...

Vilasrao Shinde: Ajat Shatru | विलासराव शिंदे : अजात शत्रू

विलासराव शिंदे : अजात शत्रू

विलासराव शिंदे या नावातच खरी ताकत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, ए. आर. अंतुले ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांच्यासोबत त्यांनी काम केले. सत्ताधारी गटाबरोबर विरोधी गटातील ही सर्वांसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध होते. विलासराव शिंदे यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले. मात्र, त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती, उपाध्यक्ष या माध्यमातून लोकहिताची कामे केली.

राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर सांगली जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत भूषवले. त्यांचे संघटन कौशल्य वादातीत होते. सत्ता असो वा नसो त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असायची. लोकनेते राजारामबापू पाटील व मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत काही काळ अटीतटीचा संघर्ष झाला. मात्र, त्यानंतर बेरजेचे राजकारण करीत शिंदे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विकास कामांना प्राधान्य दिले. सांगली सातारा विधान परिषद आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष यासह विविध पदांवर काम करताना सामान्य जनतेशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

आष्टा शहरातील विविध विकास कामे हीच त्यांची खरी स्मारके आहेत. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. सतत लोकहिताचा ध्यास घेतलेल्या विलासराव शिंदे यांनी आष्टा शहरातील गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांची अचानक एक्झिट सर्वांनाच चटका लावणारी होती. शिंदे साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

- सुरेंद्र शिराळकर

Web Title: Vilasrao Shinde: Ajat Shatru