Vidarbha elections also, 'Live Ray he video'! | विधानसभा निवडणुकीतही ‘लाव रे तो व्हिडीओ’!
विधानसभा निवडणुकीतही ‘लाव रे तो व्हिडीओ’!

ठळक मुद्देप्रचाराचा फन्डा : राष्टवादी-भाजप आमनेसामने

अशोक पाटील

इस्लामपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा प्रचाराचा फन्डा गाजला होता. त्याची कॉपी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी वाळवा-शिराळ्यात राजू शेट्टींच्या प्रचार सभांतून केली. हाच फन्डा आता राष्टवादी आणि भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरला जाणार आहे. यासाठी एकमेकांविरोधातील व्हिडीओ चित्रण गोळा करण्यात दोन्ही पक्ष व्यस्त आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी चित्रफितींचा प्रभावी वापर करून घेतला. त्यांचे ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य महाराष्टÑात गाजले. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या धर्तीवर ‘लाव रे तो व्हिडीओ’ ही स्लोगन वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला. आता विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे ‘टार्गेट’ राहणार आहेत. त्यासाठी ते पुन्हा चित्रफितींचा आधार घेणार आहेत. प्रत्यक्ष अंमलात न आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणा, विकासकामांची उद्घाटने होऊन वर्षानुवर्षांचा कालावधी लोटला; तरी न झालेली कामे, दुष्काळाच्या प्रश्नावरील सरकारच्या फोल ठरलेल्या घोषणा, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर दिलेली आश्वासने याच्या चित्रफिती गोळा करण्यात राष्टवादीची टीम व्यस्त आहे. प्रचारात त्यांचा खुबीने वापर केला जाणार आहे.

आ. जयंत पाटील यांना रोखण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी केली आहे. त्यांच्या सोबतीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व राज्यातील अनेक दिग्गजांचा फौजफाटा असेल. आ. पाटील यांना राज्यभर प्रचारासाठी फिरावे लागणार आहे. त्यांनी स्वत:च्याच मतदारसंघात अडकून पडावे, यासाठी भाजपमधील दिग्गज नेते वाळवा-शिराळ्यात ठाण मांडून डावपेच आखणार आहेत. आमदार पाटील यांच्या कारकीर्दीमधील काही चित्रफिती मिळतात का, याचा शोध भाजपकडून सुरू असल्याचे कळते. भाजपकडूनही त्या चित्रफितींचा वापर प्रचारात होण्याची शक्यता आहे.

 

 


Web Title: Vidarbha elections also, 'Live Ray he video'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.