नेत्यांच्या जिरवाजिरवीत आटपाडीचा बळी
By Admin | Updated: January 2, 2015 00:09 IST2015-01-01T22:47:41+5:302015-01-02T00:09:29+5:30
राजकीय संघर्ष कुणासाठी : ९२ कोटींच्या पाणी योजनेवरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

नेत्यांच्या जिरवाजिरवीत आटपाडीचा बळी
अविनाश बाड -आटपाडी -खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात एकवेळचा अपवाद वगळता, कायम खानापूर तालुक्यातील नेतृत्वाला विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ज्या भागात सत्ता, त्या भागाचा विकास, हे सूत्र खानापूर आणि विसापूर मंडलाच्या तुलनेत आटपाडी तालुक्याच्या मागासलेपणावरून स्पष्ट होते. आता ९२ कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरून आ. अनिल बाबर आणि जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे एकमेकावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नेत्यांच्या एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात आटपाडी तालुक्याचा मात्र कायमच बळी दिला जात आहे. याबद्दल तालुकावासीयांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जिल्ह्यात पहिला टॅँकर ज्या आटपाडी तालुक्यात सुरू केला जातो, तो तालुका कायमस्वरूपी टॅँकरमुक्त होईल, अशी आशा ९२ कोटींच्या तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेमुळे निर्माण झाली. कृष्णा नदीतून धनगाव येथून थेट आटपाडी तालुक्यातील ५३ गावांना शुध्द पिण्याचा पाणीपुरवठा करणारी ही योजना आहे. या योजनेचे कामही प्रत्यक्षात सुरू झाले असून १० टक्के काम झाले आहे. दि. ४ डिसेंबर रोजी आ. अनिल बाबर यांनी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सादीगले यांची भेट घेतली. त्यावेळी बाबर यांनी या योजनेला विरोध केल्याचे वृत्त आले. त्यानंतर त्यावर ही योजना ज्यांनी खूप प्रयत्नांनी पदरात पाडून घेतली, त्या अमरसिंह देशमुख यांनी बाबर यांच्यावर जोरदार टीका केली. आता बाबर यांचे म्हणणे आहे की, मी आटपाडी तालुक्यातीलच जांभुळणी आणि नेलकरंजी गावच्या किरकोळ पाणी योजनेच्या कामांसाठी भेट घेतली. पाणी योजनेला विरोध केलाच नाही.
या सगळ्या संशयकल्लोळामुळे तालुकावासीय मात्र बुचकळ्यात पडले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमरसिंंह देशमुख यांनी बाबर यांच्यावर सदाशिव पाटील यांच्या तुलनेत अधिक टीकेची झोड उठविली होती. आताही देशमुख यांनी बाबर यांचे टॅँकरचा ठेका घेणारे आणि टॅँकर चालविणाऱ्या बगलबच्च्यांसाठी विरोध केल्याचा आरोप केला होता. यावर बाबर म्हणतात, टॅँकरमुक्तीचे काम त्यांनी त्यांच्या गावापासूनच सुरू केले आहे. २०१३ चा भीषण दुष्काळ तालुकावासीयांनी अनुभवला आहे. त्यावेळी कुणाचे पिण्याच्या पाण्याचे टॅँकर होते, कुणाच्या जनावरांच्या छावण्या होत्या, कुणी पिण्याच्या पाण्याच्या पैशावर डल्ला मारला आणि कुणी कुणी छावण्यांतील जनावरांच्या तोंडातील घास खिशात घातला, हे सगळे तालुकावासीयांना माहीत आहे. आटपाडी तालुक्याचा दुष्काळ कायमचा संपू नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. ही मंडळी जीवघेण्या दुष्काळापेक्षा तालुक्याचे खरे शत्रू आहेत. कृष्णा नदीतून करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या श्रेयाबाबत नेतेमंडळींमध्ये बाद होणे समजण्यासारखे आहे. आ. बाबर अतिशय अभ्यासू नेते आहेत. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची खास पध्दत आहे. पण आटपाडी तालुक्याच्यादृष्टीने या योजनेबाबत वाद निर्माण होणे हे सुध्दा दुर्दैवीच आहे.
ँमग जातील टँकर कुणीकडे ?
२०१३ च्या जीवघेण्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील अनेकांनी मुंबईतून जुने टॅँकर खरेदी केले आणि तालुक्याला पाणी पाजले. पाऊस पडल्यापासून हे सर्व टॅँकर आता उभे आहेत. ज्यांच्यात धमक आहे, ज्यांना पुढारी आणि सरकारी बाबूंची फिल्डिंग लावायला जमली, त्यांनी ट्रकमधील टाकी काढून वाळू वाहतूक सुरू केली. पण वाळू वाहतूक करणे पाणीपुरवठ्यापेक्षा खूप कठीण काम आहे. त्यामुळे या मंडळींचा पाणीपट्टीच्या नावाखाली पाणी योजनेला छुपा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टॅँकर लॉबीला साथ देणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेवरच योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.