भाजीपाला सौदे आजपासून बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:25+5:302021-04-23T04:29:25+5:30

सांगली : येथील फळ मार्केटमध्ये भाजीपाला सौदे काढण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रतिबंध केला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून भाजीपाला सौदे ...

Vegetable deals will be closed from today | भाजीपाला सौदे आजपासून बंद करणार

भाजीपाला सौदे आजपासून बंद करणार

सांगली : येथील फळ मार्केटमध्ये भाजीपाला सौदे काढण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रतिबंध केला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून भाजीपाला सौदे निघणार नसल्याचे होलसेल विक्रेत्यांनी स्पष्ट केले. भाजीपाला सौद्यासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे त्यामुळे कोरोनाच्या या काळात जिल्ह्यात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

होलसेल भाजीपाला संघटनेचे इम्तियाज बागवान, जमील बागवान, मल्लिकार्जुन चौगुले, फारूक पखाली, शिवाजी कोळी, जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांची बैठक झाली. महापालिकेने कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, शिवाजी मंडईतील भाजीपाला सौदे बंद केले. होलसेल विक्रेत्यांना फळ मार्केटमध्ये सौदे काढण्याची सूचना केली. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून फळ मार्केटमध्ये सौदे निघत होते. पण वाढती गर्दी पाहता मार्केट कमिटीनेही भाजीपाला व्यापाऱ्यांना आता प्रतिबंध केला आहे. त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांनी उद्यापासून सौदे न काढण्याचा निर्णय घेतला.

याबाबत बागवान, काटकर म्हणाले की, शिवाजी मंडईतील होलसेल व्यापारी हे मार्केट कमिटीचे परवानाधारक आहेत. फळ मार्केटमध्ये भाजीपाला सौद्यासाठी हाॅलही बांधण्यात आला आहे. पण हा हाॅल कांदा, बटाटा व्यापाऱ्यांना दिला आहे. महापालिकेने शिवाजी मंडई बंद केल्यानंतर दोन दिवस फळ मार्केटमध्ये सौदे निघाले. पण आता गर्दीचे कारण सांगून होलसेल व्यापाऱ्यांना तेथूनही हाकलण्यात येत आहे. भाजीपाला हा नियमनमुक्त असल्याने त्यातून मार्केट कमिटीला उत्पन्न मिळणार नसल्यानेच भाजीपाला सौद्याला अटकाव केला जात असल्याचा आरोप केला. आता महापालिका व मार्केट कमिटीने कायमस्वरुपी भाजीपाला सौद्यासाठी जागा द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

चौकट

सॅन्थाॅम शाळेच्या जागेत सौदे

फळ मार्केटपासून जवळ असलेल्या सॅन्थाॅम इंग्लिश स्कूलच्या क्रीडांगणाची जागा आहे. तिथे तात्पुरत्या स्वरुपात होलसेल व्यापाऱ्यांनी भाजीपाला सौदे काढावेत, असा तोडगा आयुक्त नितीन कापडणीस यांनी काढला आहे. पण या शाळेकडे जाणारा रस्ता फारच छोटा असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Web Title: Vegetable deals will be closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.