वसंतदादा कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:36+5:302021-03-24T04:24:36+5:30
सांगली : वसंतदादा कारखान्याची ४०० कोटींची देणी होती. त्यातील १९० कोटी रुपयांची देणी भागविली असून, कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीकडे सुरु ...

वसंतदादा कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीकडे
सांगली : वसंतदादा कारखान्याची ४०० कोटींची देणी होती. त्यातील १९० कोटी रुपयांची देणी भागविली असून, कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीकडे सुरु आहे, अशी माहिती अध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी वार्षिक सभेत दिली.
साखर कारखान्याची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी कारखाना कार्यस्थळात व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे पार पडली. यावेळी विशाल पाटील म्हणाले की , लवकरच कारखाना सर्व देण्यातून मुक्त होईल. कारखाना अडचणीच्या परिस्थितीतही यशस्वी वाटचाल करीत असताना आम्हास फौजदारीच्या नोटीस देऊन घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यास प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत. शासनाला कराच्या रुपाने आम्ही खूप दिले आहे. देणी देताना आता प्रथम प्राधान्य शेतकऱ्यांना असेल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचीही राहिलेली देणी दिली जातील. शेतकरी व कामगारांची देणी भागविल्यानंतर शासनाची देणी दिली जातील.
गतवर्षी एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सुमारे ७७ कोटी कर्जाची परतफेड करुन कारखान्याची मालमत्ता त्या बँकेकडून सोडवून घेतली आहे. आता केवळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचेच कर्ज शिल्लक आहे. कारखान्याने कोरोना काळात देशात सर्वप्रथम सॅनिटायझर बनवून जिल्ह्यात सर्वत्र तसेच प्रत्येक सभासदाच्या घरी सॅनिटायझर पोहोच केले. बुधगाव, नावरसवाडी येथे ठिबक सिंचन सुरु करुन त्या माध्यमातून चांगल्या रिकव्हरीचा व एकरी जास्त उत्पादनाचा ऊस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याच पद्धतीने कारखाना परिसरात आणखी चार ते पाच ड्रिप एरिगेशन योजना कारखान्याच्या माध्यमातून लवकरच सुरू केल्या जातील.
कारखाना स्थापनेवेळी घेतलेले शेअर्स वारसांच्या नावांवर वर्ग करण्यासाठी कारखान्याकडून विशेष सहकार्य केले जाईल. शेतकरी सभासदांच्या पाल्यांना दरवर्षी वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेजमार्फत दीड कोटीची फी सवलत दिली जात आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता येत आहे. यावेळी कारखान्याचे सभासद प्रभाकर पाटील यांनी भूविकास बँकेच्या पुनर्जीवन प्रकरणी कारखान्याने विशेष लक्ष घालावे व तोडणी वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांच्या अडवणुकीवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी दत्त इंडियाने गळीत हंगाम सन २०१७-१८ मधील २०० रुपये फरकाची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देण्याची मागणी केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, संचालक अमित पाटील, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, शिवाजीराव पाटील, सपंत माने, संभाजी मेंडे, सुरेश पाटील, गणपतराव सावंत, राजेंद्र पाटील उपस्थित होते. कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी स्वागत केले. संचालक अमित पाटील यांनी आभार मानले.