वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पूर्ण
By Admin | Updated: July 7, 2016 00:21 IST2016-07-06T23:58:11+5:302016-07-07T00:21:00+5:30
आठवड्यात दोषारोपपत्र : १७0 कोटी रुपयांचा घोटाळा; तत्कालीन संचालक, कर्मचाऱ्यांचे लक्ष नोटिसांकडे

वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पूर्ण
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७0 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशी पूर्ण केली असून, येत्या आठवड्याभरात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली होती. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर महिन्यापूर्वी यातील दोन अधिकाऱ्यांना चौकशीतून वगळले आहे. तत्कालीन अध्यक्ष मदन पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे माजी संचालक, कर्मचारी आणि मृत कर्मचारी, संचालकांचे वारस अशांची संख्या आता शंभरावर गेली आहे. यापैकी कितीजणांवर दोषारोपपत्र दाखल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसंतदादा बँकेच्या घोटाळ्यात अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने या चौकशीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यावर सुनावणी होऊन जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. दोषारोपपत्र दाखल होणार असल्याने तत्कालीन संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची चिंता वाढली आहे. वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सहकारमंत्र्यांकडे दोन अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अपिलामुळे काहीकाळ ही चौकशी प्रक्रिया रेंगाळली होती. मात्र स्थगिती दोन अधिकाऱ्यांपुरतीच असल्याचे कळल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी यास पुन्हा गती दिली. घोटाळ््यात अडकलेल्या बहुतांश माजी संचालक व कर्मचाऱ्यांचे म्हणणे सादर झाले आहे.
चौकशी प्रक्रिया गत आठवड्यात पूर्ण झाली आहे. येत्या आठ दिवसात यासंदर्भातील दोषारोपपत्र दाखल होणार आहे. त्यासंदर्भातील तयारी आता चौकशी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
नियमबाह्य कर्ज : अडचणीस कारणीभूत
वसंतदादा शेतकरी सहकारी बँक अवसायनात काढण्यात आली आहे. बॅँकेचे एकूण २ हजार ७०० कर्जदार आहेत. कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे बँक अडचणीत आली. नियमबाह्य कर्ज वाटपामुळेच बँक अवसायनात गेल्याने बँकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी व कर्मचारी अडचणीत आले आहेत. सध्या वसुलीचे काम गतीने सुरू असले तरी, बँक पूर्णपणे अडचणीतून बाहेर पडलेली नाही. मालमत्तांची जप्ती, लिलाव काढून वसुली करण्यात येत आहे.
अडकलेले तत्कालीन संचालक...
४शशिकांत कलगोंड पाटील, नरसगोंडा सातगोंडा पाटील, सुरेश आदगोंडा पाटील, अमरनाथ सदाशिव पाटील, किरण राजाभाऊ जगदाळे, माधवराव ज्ञानदेव पाटील, तुकाराम रामचंद्र पाटील, सुरेश देवाप्पा आवटी, कुंदन बापूसाहेब पाटील, प्रमिलादेवी प्रकाशराव माने, सुभाष गणपती कांबळे, दादासाहेब वाघू कांबळे, निवृत्तीराव मारुती पाटील, सतीश आप्पासाहेब बिरनाळे, जंबुराव दादा थोटे, भरत महादेव पाटील, विजय विरुपाक्ष घेवारे, शिवाजीराव रामचंद्र पाटील, भगवान सीताराम पाटील, शिवगोंडा बंडू लांडे, बाजीराव रामराव पाटील, मुजीर आब्बास जांभळीकर, बेबीताई मारुती पाटील, वंदना संभाजी पाटील, निवास दत्ताजीराव देशमुख, दत्तात्रय श्रीपती सूर्यवंशी, सुधाकर धोंडिराम आरते, गजानन लक्ष्मणराव गवळी, सर्जेराव सखाराम पाटील, सुरेश जिनगोंडा पाटील, अरविंद शामराव पाटील, श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे, आनंदराव मारुती पाटील यांच्यासह दिवंगत अध्यक्ष मदन पाटील यांच्या वारसांचाही याप्रकरणी समावेश करण्यात आला आहे.