इस्लामपूर पालिकेचे वैभव साबळे नवे मुख्याधिकरी; विकास आघाडी आणि राष्ट्रवादीत समन्वय साधण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 15:21 IST2021-09-09T15:21:43+5:302021-09-09T15:21:58+5:30
मुख्याधिकारी अरविंद माळी हे काही महिन्यांचे पाहुणे ठरले.त्यांना आपल्या कामाची छाप दाखवता आली नाही.

इस्लामपूर पालिकेचे वैभव साबळे नवे मुख्याधिकरी; विकास आघाडी आणि राष्ट्रवादीत समन्वय साधण्याचे आव्हान
इस्लामपूर: गेल्या तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर वैभव साबळे हे नवे अधिकारी येणार असल्याची चर्चा होती.आज अपेक्षेनुसार नगरविकास विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत.साबळे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. शहरातील अनेक विकासकामांसह सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय साधून काम करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
यापूर्वीचे मुख्याधिकारी अरविंद माळी हे काही महिन्यांचे पाहुणे ठरले.त्यांना आपल्या कामाची छाप दाखवता आली नाही. त्यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांची सोलापूर जिल्ह्यात बदली झाली.तेव्हापासून गेली तीन महिने या मोठ्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकारी बघत होते. याकाळात अनेक विकासकामांबाबतचे धोरणात्मक निर्णय होण्यात अडचणी आल्या.त्यातून कामे खोळंबून राहिली होती.
वैभव साबळे हे आता नवे मुख्याधिकारी म्हणून लवकरच सुत्रे स्विकारणार आहेत.भुयारी गटार,रस्ते आणि उर्वरित विकासकामे गतीला लावण्याचे आव्हान आहे.सध्या शहरातील गाळे लिलावाची प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे.तांत्रिक आणि प्रशासकीय कारणासाठी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. ती सुरळीतपणे पार पाडण्याचेही आव्हान असणार आहे.तसेच विकास आघाडी आणि राष्ट्रवादीमधील राजकीय डावपेचात न अडकता त्यांना काम करावे लागणार आहे.