सांगली, मिरज सिव्हिलमधील रिक्त जागा दोन महिन्यात भरणार - हसन मुश्रीफ
By शीतल पाटील | Updated: October 23, 2023 20:42 IST2023-10-23T20:42:23+5:302023-10-23T20:42:53+5:30
येत्या दोन महिन्यात टप्पाटप्प्याने सर्वच विभागातील रिक्त जागा भरल्या जातील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सांगली, मिरज सिव्हिलमधील रिक्त जागा दोन महिन्यात भरणार - हसन मुश्रीफ
सांगली : सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात रिक्त जागांमुळे रुग्णसेवेवर ताण पडत आहे. मिरजेतून साताऱ्यात बदली झालेल्या २५ डाॅक्टरांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही डाॅक्टरांच्या बदल्यात तांत्रिक अडचणी आहेत. येत्या दोन महिन्यात टप्पाटप्प्याने सर्वच विभागातील रिक्त जागा भरल्या जातील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मंत्री मुश्रीफ यांनी सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, सिव्हीलमध्ये येत्या दोन महिन्यात सर्व रिक्त जागांवर कर्मचाऱयांची मेगा भरती केली जाणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांची आवश्यकता असणाऱया विभागांचा आढावा घेतला आहे. काही डॉक्टरांच्या बदल्या करण्यात तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत आहेत. शासनस्तरावर पाठपुरावा करुन सांगली, मिरज सिव्हीलमध्ये तज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली जाईल. दोन महिन्यानंतर एकही जागा रिक्त राहणार नाही.
सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात औषधे खरेदीचे सर्वाधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समिती मार्फत औषधांसह रुग्णालयांमध्ये लागणाऱया यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजनमधून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. सांगलीत पाचशे आणि मिरजेत अडीचशे अशा साडेसातशे बेडसह नर्सिंग कॉलेजमध्ये शंभर विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविण्याचा प्रस्तावही शासनाकडे सादर केला आहे.