‘उदगिरी’ची ऊस वाहतूक रोखली

By Admin | Updated: December 26, 2014 00:18 IST2014-12-25T22:43:00+5:302014-12-26T00:18:04+5:30

मंगरूळ चिंचणीत प्रकार : रस्ते उखडल्याने ग्रामस्थ संतप्त

'Uudagiri' stopped the transportation of sugarcane | ‘उदगिरी’ची ऊस वाहतूक रोखली

‘उदगिरी’ची ऊस वाहतूक रोखली

पारे : चिंचणी (मं.) येथील संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी रात्री सात वाजता उदगिरी शुगरची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. गेल्या दोन वर्षापासून बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे चिंचणी (मं.) परिसरातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरूस्त करावेत, तसेच पारे तलावातून ओढ्यात सोडण्यात आलेले पाणी कारखान्याने उचलू नये, यासह विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या. यावेळी कारखाना प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. अखेर कारखान्याचे उपाध्यक्ष एन. एस. कदम यांनी तातडीने रस्ते दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
बामणी-पारे येथील उदगिरी शुगर अ‍ॅन्ड पॉवर या साखर कारखान्यासाठी कार्वे-चिंचणी ते बामणी आणि रिकाम्या गाड्यांसाठी बामणी ते मंगरूळमार्गे असा ऊस वाहतुकीचा मार्ग तयार केला आहे. या ऊस वाहतुकीमुळे कार्वे, मंगरूळ, चिंचणी, बामणी परिसरातील रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. चिंचणी येथील विद्यालयाजवळच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच पारे तलावातून रब्बी पिकांसाठी पाटबंधारे विभागाने ओढ्याला पाणी सोडले आहे. पारे हद्दीत ओढ्यालगत असलेल्या एका विहिरीतील पाणी कारखान्यासाठी वापरले जाते. त्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे हे पाणीही तातडीने बंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती.
या पार्श्वभूमीवर बुधवारी चिंचणी (मं.) येथील संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी या मागण्यांसाठी विद्यालयाजवळ उदगिरी कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. त्यावेळी प्रशासन अधिकारी अमोल पाटील पोलीस कुमक घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. कारखान्याच्या उपाध्यक्षांनाच बोलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर तासाभरानंतर उपाध्यक्ष कदम आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करीत तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखून धरलेली ऊस वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
यावेळी चिंचणी येथील सरपंच शिवाजीराव निकम, किसन निकम, बालाजी निकम, विकास शिंदे, कुमार निकम उपस्थित होते. (वार्ताहर)

आश्वासनानंतर वाहतूक सुरळीत
उदगिरी कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. यावेळी प्रशासन अधिकारी अमोल पाटील पोलीस कुमक घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. कारखान्याच्या उपाध्यक्षांनाच बोलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर तासाभरानंतर उपाध्यक्ष कदम आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करीत तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखून धरलेली ऊस वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

Web Title: 'Uudagiri' stopped the transportation of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.