Until the tambu water is available, the villages in the village are dry | टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यंत, आटपाडीतील गावे कोरडीच -: पाणी कधी मिळणार
आटपाडी तलावातून सांगोला तालुक्यात शुक्र ओढ्यातून असे गेले १० दिवस पाणी सोडले जात आहे. पहिले दोन दिवस एक हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देतालुक्यातील ओढे, तलाव, विहिरी अद्याप रिकाम्या

अविनाश बाड ।
आटपाडी : सध्या आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तालुकावासीयांनी वारंवार मागणी करूनही टेंभूचे पाणी उशिरा तालुक्यात दाखल झाले. पण सध्या टेंभूचे पाणी वेगाने सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यात सोडले जात आहे. आटपाडीपासून ५० कि.मी.पर्यंत सांगोला तालुक्यात पाणी गेले, पण आटपाडी तालुक्यातील तलाव कोरडे आहेत. त्यामुळे आटपाडी तालुका उपाशी, तर सांगोला तालुका तुपाशी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी सोडून तालुक्यातील सर्व ओढे, बंधारे, तलाव भरावेत, अशी लोकांची मागणी आहे.

तालुक्यात दि. १८ सप्टेंबर रोजी टेंभूचे पाणी आले. दि. २२ रोजी आटपाडी तलावात पाणी आले. तीनच दिवसात ३०८.९७ द.ल.घ.फूट एवढा पाणीसाठा होऊन पाणी सांडव्यावरून वाहू लागले. तेव्हापासून आजअखेर आटपाडीच्या शुक्र ओढ्यातून सांगोला तालुक्यात पाणी सुरू आहे. आटपाडीपासून लोणारवाडी, बलवडी, नाझरे, वाटंबरे ते कडलासच्या पुढे ५० कि.मी.पर्यंत माणगंगा नदीतून बंधारे भरत पाणी सोडले जात आहे. वाईट म्हणजे, आटपाडी तालुक्यातील माणगंगा नदी कोरडी आहे. आटपाडी तालुक्यातील गवळेवाडी, आवळाई, विठलापूर, कौठुळी या गावांना ओढ्यातून पाणी सोडून वर्ष झाले. या गावांना त्यानंतर टेंभूचे पाणी सोडले नाही.

त्यामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. तिथे खरिपाची पेरणीही झाली नाही. तसेच रब्बी हंगामाची पेरणी पावसाअभावी होणार नाही. दिघंची परिसर कोरडा आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी येऊनही केवळ नियोजन नसल्याने तालुकावासीयांना दुष्काळावर मात करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

सांगोल्याला ४००, तर आटपाडीला १०0
तालुक्यात आधी पाणीपट्टीचे पैसे भरूनही टेंभूचे पाणी सोडले जात नाही, असा अनेकदा अनुभव घेतलेल्या आटपाडीकरांच्या जखमेवर हे पाणी सध्या मीठ चोळण्याचे काम करत आहे. सांगोला तालुक्यात सध्या ३०० क्युसेक वेगाने आटपाडी तलावातून आणि घाणंद-हिवतड कालव्यातून जुनोनी, कोळे या सांगोला तालुक्यातील गावांना १०० क्युसेक असे एकूण ४०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे, तर आटपाडी तालुक्यात निंबवडे तलावात फक्त १०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हा अन्याय संतापजनक आहे.

कोरडे पडत चाललेले तलाव
तलाव क्षमता पाणीसाठा
(द. ल. घ. फू.)
कचरे वस्ती ११०.४१ ३६
बनपुरी ४७.४९ ५
निंबवडे २३५.१५ १२२
दिघंची १४२.५० ९
शेटफळे ५६.९३ कोरडा
माळेवस्ती ६६.३० १२
अर्जुनवाडी ८३.२१ १३
मानेवाडी ३९.७१ ५

 

Web Title: Until the tambu water is available, the villages in the village are dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.