लग्नाच्या आमिषाने दोन युवतींचे अपहरण
By Admin | Updated: December 24, 2014 00:24 IST2014-12-23T22:44:35+5:302014-12-24T00:24:03+5:30
तासगाव तालुक्यातील घटना : विसापूरच्या दोघांवर गुन्हा

लग्नाच्या आमिषाने दोन युवतींचे अपहरण
तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलींना दोघांनी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना रविवार, दि. २१ रोजी घडली. याबाबत दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी आज (मंगळवारी) तासगाव पोलिसात फिर्याद दिली असून, दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी दिली.
विशाल पांडुरंग माळी व सैफअली कोंडा मुलाणी (दोघेही रा. विसापूर, ता. तासगाव) या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही युवती तासगावातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत. या दोघीही आपापल्या घरातून दि. २१ रोजी सकाळी नऊ वाजता क्लासला जाणार असल्याचे सांगून बाहेर पडल्या, पण रात्री नऊपर्यंत त्या घरी न परतल्याने घरच्या मंडळींनी पै-पाहुण्यांकडे विचारपूस केली. दि. २२ रोजी सकाळी आठच्या दरम्यान त्या शिकत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातही चौकशी करण्यात आली, पण त्या क्लासला आल्याच नसल्याचे समजले. तसेच दि. २१ रोजी सकाळी दहाच्यादरम्यान दोघीही तासगावच्या बसस्थानकावर संशयित मुलांबरोबर दिसल्याचे महाविद्यालयातील काही मुलांनी सांगितले. त्यानुसार दोघा संशयितांविरुद्ध मुलींच्या घरच्यांनी आज फिर्याद दिली. (वार्ताहर)