विट्यातील दोन वर्षाच्या चिमुकल्याचा विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:53+5:302021-06-21T04:18:53+5:30
विटा : लहान मुलांची स्मरणशक्ती वयोवृद्ध लोकांनाही मागे पाडते. बऱ्याच वेळा लहान मुलांची कृती ही अचंबित करणारी असते. याचा ...

विट्यातील दोन वर्षाच्या चिमुकल्याचा विश्वविक्रम
विटा : लहान मुलांची स्मरणशक्ती वयोवृद्ध लोकांनाही मागे पाडते. बऱ्याच वेळा लहान मुलांची कृती ही अचंबित करणारी असते. याचा प्रत्यय विटा येथील झैन निहाल अहमद शिकलगार या दोन वर्षे वयाच्या चिमुकल्याबाबत पहावयास मिळाला. अवघ्या दोन वर्ष्याच्या झैन याने आपल्या विविध कलागुणांना वाव दिल्याने त्याचे ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदविले गेले आहे. ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह चाइल्ड’ या शीर्षकाअंतर्गत त्याच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
विटा येथील दोन वर्षे वयाच्या झैन याला अभ्यासाची व नावीन्यपूर्ण गोष्टीची उत्सुकता राहिलेली आहे. यातूनच त्याला सर्व इंग्रजी मुळाक्षरे आणि अंकगणित लिहिता व वाचता येतात. याव्यतिरिक्त अनेक भूमितीय आकार, वेगवेगळे रंग, विविध प्राणी, पक्षी, मानवी अंग, वाहने, भाज्या, फळे, यांत्रिकी उपकरणे व अनेक व्यवसायांची नावे तो सहजरीत्या ओळखतो. झैन हा त्याच्या उपजत बुद्धीने अगदी नावीन्यपूर्णरीत्या कोणत्याही संसाधनाच्या आधारे इंग्रजी मुळाक्षरे ओळखतो. घड्याळ्याच्या काट्यांच्या आधारे तसेच हातांच्या बोटांच्या साहाय्याने ही तो मुळाक्षरे उच्चारतो. वास्तविक, लहान वयात मुलांना त्यांची नावे आठवत नाहीत. पण झैन हा त्याचा इंग्लिशमध्ये पूर्ण परिचय देतोच शिवाय तो आठवड्याचे दिवस, वार्षिक महिने, आपल्या आई-बाबांचा व्यवसाय ही दिमाखदार पद्धतीने सांगतो.
विटा येथील झैन हा अतिशय कमी वेळात १४ भागांचा पझल गेमही सोडवतो. त्याच्या या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी डॉ. अनिता गुप्ता यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर डॉ. प्रा. दिनेश गुप्ता यांनी या रेकॉर्डची नोंद घेतली. अवघ्या दोन वर्षाच्या झैन निहाल अहमद शिकलगार याची विश्वविक्रमात नोंद झाल्याने विटेकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
फोटो : २० झैन शिकलगार