कलशातून काढले दोन टन निर्माल्य... सांगलीकरांचा प्रतिसाद
By Admin | Updated: September 4, 2014 00:04 IST2014-09-03T23:37:17+5:302014-09-04T00:04:29+5:30
गणेशभक्तांनीही नदीघाटावर न येता विसर्जन कुंडात ३९० ‘श्रीं’चे विसर्जन केले.

कलशातून काढले दोन टन निर्माल्य... सांगलीकरांचा प्रतिसाद
सांगली : गणेशोत्सवात यंदा गणेशभक्तांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. विविध सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा गणेशभक्तांनी ३९० ‘श्रीं’चे विसर्जन कृष्णा नदीत न करता विसर्जन कुंडात केले आहे. तसेच निर्माल्य नदीत विसर्जित करून पाणी प्रदूषणाला हातभार न लावता प्राधान्यक्रमाने निर्माल्य कलशातच विसर्जन केले आहे. रात्रीपर्यंत दोन टन निर्माल्य जमा झाले होते. पाचव्यादिवशी महापालिका क्षेत्रातील ७८ गणेश मंडळांनी ‘श्रीं’ना भक्तिभावाने निरोप दिला.
मागील काही वर्षांपासून पर्यावरणाला हानी होऊ न देता गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्यादिवशी नदीघाटावरील गणेशभक्तांची गर्दी कमी व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे विश्रामबाग, गव्ह. कॉलनी, वसंतनगर, सह्याद्रीनगर आदी उपनगरांत आठ विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. परिसरातील बहुतांशी गणेशभक्तांनी विसर्जन कुंडात ‘श्रीं’चे विसर्जन केले. तसेच मंगळवारी दुपारपासून नदी घाटावर महापालिका आणि डॉल्फीन नेचर रिसर्च ग्रुपचे कार्यकर्ते निर्माल्य नदीत विसर्जित करू नका, असे वारंवार आवाहन करत होते. गणेशभक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नदीत निर्माल्याचे विसर्जन करणे टाळले आणि महापालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये निर्माल्याचे विसर्जन केले. जमा झालेल्या निर्माल्याचा वापर खत तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे.
पाचव्यादिवशी महापालिका क्षेत्रातील काही गणेश मंडळांच्या ‘श्रीं’ना निरोप देण्यात येतो. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी रात्री उशिरापर्यंत नदी घाटासह चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी रात्री ७८ गणेश मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. उद्या गुरुवारी सातव्यादिवशीही नदी घाटावर येणाऱ्या गणेशभक्तांची जनजागृती करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
महापालिकेतर्फे उपनगरात विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. गणेशभक्तांनीही नदीघाटावर न येता विसर्जन कुंडात ३९० ‘श्रीं’चे विसर्जन केले.