सांगली जिल्ह्यातील दोन हजार गुंड रडारवर!
By Admin | Updated: September 23, 2014 23:54 IST2014-09-23T23:35:16+5:302014-09-23T23:54:29+5:30
विधानसभा निवडणूक : पोलीस प्रमुखांकडून जिल्ह्याचा दौरा

सांगली जिल्ह्यातील दोन हजार गुंड रडारवर!
सचिन लाड-सांगली -विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे. सुमारे दोन हजार गुंड कारवाईसाठी पोलिसांच्या रडारवर आहेत. यातील पाचशेहून अधिक गुन्हेगारांवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत जिल्ह्याचा दौरा करून शांततेसाठी थेट लोकांशी संवाद साधत आहेत.
निवडणुकीत वाद-विवाद व प्रसंगी हाणामारीचे प्रकार घडतात. सांगली जिल्ह्याची संवेदनशील म्हणून ओळख आहे. यामुळे सावंत यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे. दररोज नाकाबंदी करून, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची धरपकड केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरारी असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गर्दी मारामारी यासह दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी यादी काढण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी यादी काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)
सांगलीचे कारागृह
खचाखच
भरले
पोलिसांनी सुरू केलेली प्रतिबंधात्मक कारवाई व बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटमुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजअखेर (मंगळवार) ३७८ कैदी असून, यामध्ये ३६५ पुरुष व १३ महिलांचा समावेश आहे. यापूर्वी वकिलांनी खंडपीठासाठी केलेल्या आंदोलनावेळी कैद्यांना जामीन मंजूर न झाल्याने ही संख्या ३८५ पर्यंत गेली होती. कैद्यांची संख्या वाढली असली, तरी त्याचा कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी सांगितले.
निवडणुकीत गुन्हेगारांचा त्रास वाढतो. हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने येथे गर्दी असते, यातून हाणामारीचे प्रकार घडतात. पोलिसांनी या सर्वांना ‘टार्गेट’ करून कारवाईचा धडाका लावला आहे. त्याचा अनुकूल परिणाम झाला आहे.
पोलीसप्रमुख सावंत यांनीही जेथे तणाव निर्माण होऊ शकतो, अशा ठिकाणी जाऊन थेट लोकांशी संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात ते जत तालुक्यात जाऊन आले. निवडणुकीत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन तेथील लोकांना त्यांनी केले.