तासगाव : वासुंबे (ता. तासगाव) येथे एका धक्कादायक घटनेत सतीश महालिंग देशमाने (वय ३८) आणि सिंधू रमेश काटकर (वय अंदाजे ३५) या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद तासगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सतीश देशमाने आणि सिंधू काटकर हे दोघेही मूळचे राजापूर (ता. तासगाव) गावचे रहिवासी होते. गेल्या काही महिन्यांपासून ते वासुंबे येथील सरस्वती नगरमध्ये सिंधू व त्यांच्या दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास सिंधू यांची मुले शाळेतून परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी अनेकवेळा दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घाबरलेल्या मुलांनी शेजाऱ्यांना आणि घरमालकांना बोलावले. त्यांनी दरवाजा उघडला असता दोघेही घरात मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक कलहातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा घटनास्थळी होती, मात्र पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Sangli: वासुंबे येथे विषारी औषध पिऊन दोघांनी संपविले जीवन, पोलिसांकडून अधिक तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:43 IST