कासेगावात आणखी दोन दारू दुकानांना परवानगी
By Admin | Updated: August 18, 2015 22:48 IST2015-08-18T22:48:57+5:302015-08-18T22:48:57+5:30
ग्रामसभेत निर्णय : विरोधकांसह ग्रामस्थांतून विरोध

कासेगावात आणखी दोन दारू दुकानांना परवानगी
प्रताप बडेकर- कासेगाव (ता. वाळवा) येथील दारूबंदी ठरावाबाबत तीन वर्षांपासून सत्ताधारी व विरोधकांत रणधुमाळी सुरू होती. प्रत्येक ग्रामसभेत विरोधक दारूबंदी ठरावाबाबत आग्रही होते, तर सत्ताधारी अगोदर लोकप्रबोधन व त्यानंतरच दारूबंदी, असे सांगत होते. त्यामुळे ग्रामस्थांचे लक्ष या दारूबंदीकडे लागून राहिले होते.
माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावला जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. गावातील सर्व सत्तास्थाने त्यांच्या गटाकडेच असून विरोधी गटही प्रबळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावात कायमची दारूबंदी व्हावी, याकरिता विरोधक प्रत्येक ग्रामसभेमध्ये दारूबंदी ठरावासाठी आवाज उठवत आहेत. मात्र सत्ताधारी गटाने याबाबत नेहमीच तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतली. वर्षभरापूर्वी ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील यांनी, याविषयी सत्ताधारी गटाकडून सचिन पाटील व विरोधी गटातील पांडुरंग वाघमोडे यांनी एकत्रित येऊन दारूबंदीबाबत निर्णय घ्यावा असे सुचवले होते. त्यानंतर वाघमोडे यांच्यासह विरोधकांनी दारूबंदीबाबत ठरावासाठी वारंवार आवाज उठवला. परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. दारूबंदीअगोदर गावात प्रबोधन गरजेचे आहे असे सांगत, सत्ताधारी गटाने वेळ मारुन नेली. मात्र ग्रामस्थांच्या प्रबोधनाकरिता त्यांनी कोणतेही काम केले नाही.
देवराज पाटील यांच्याकडून ग्रामस्थांचा अपेक्षाभंग
देवराज पाटील याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत दारुबंदीबाबत फारशी चर्चा न होता, या सत्ताधाऱ्यांनी आणखी दोन दारू दुकाने सुरु करण्याची परवानगी देत असल्याचा ठराव संमत केला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र गावात दारूबंदी नसल्यामुळे अर्जांना परवानगी नाकारता येणार नाही, असे देवराज पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामसभेत दारूबंदी ठराव झालेले आहेत. मात्र कासेगावात सत्ताधाऱ्यांनी दारूच्या दुकानांना परवानगी देत, खरा चेहरा लोकांना दाखविला आहे. ग्रामस्थांत याबद्दल प्रचंड नाराजी असून, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावसाठी हे भूषणावह नाही, असे मत माजी ग्रा. पं. सदस्य ज्ञानदेव पाटील यांनी व्यक्त केले.
गावाला मोठा राजकीय व क्रीडा इतिहास आहे. मात्र सत्ताधारी मंडळींनी गावात दारूच्या दुकानांना परवानगी देत तरुण पिढीला बरबाद करण्याचे ठरवले आहे. महिला सरपंचांनीही परवान्याचे समर्थन केले.
- नेताजी पाटील, विरोधी नेते, ग्रामपंचायत, कासेगाव.