सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा बँकेच्या शाखेतील लॉकर गॅस कटरने तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. असलम उर्फ टनटन मिठोरी खान (वय ६२, रा. गाव ककराला, ता. जि. बदायु, उत्तर प्रदेश), शकील अकबर कुरेशी (वय ५४, रा. इस्लामनगर, पटियाली कासगंज, उत्तर प्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. यापूर्वी टोळीतील चौघांना अटक करण्यात आलेली होती.झरे येथे दि. ७ जानेवारी रोजी जिल्हा बँकेच्या इमारतीच्या पाठीमागील खिडकीचे खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी गॅस कटरने खिडकीचे गज कापले होते. त्यानंतर लॉकर गॅस कटरने फोडून त्यातील ऐवज आणि रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. गलाई कामगार म्हणून उत्तर प्रदेशात राहणाऱ्या विश्वजीत विजय पाटील (वय २४, मूळ रा. बांबवडे, ता. पलूस) याच्या माहितीनंतर टोळी पलूस येथे आली होती.या टोळीतील राहुल रंजमीश शर्मा (वय २७, रा. गाव ककराला, ता. जि. बदायु, उत्तर प्रदेश), विश्वजीत विजय पाटील (वय २४, रा. बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली), संकेत अरुण जाधव (वय २६, रा. बलवडी, ता. खानापूर), इजाज राजू आत्तार (वय ३०, रा. आमणापूर, ता. पलूस) या चार जणांना २१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेश येथील अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी टोळीतील इतरांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.तपासात विजय पाटील हा पूर्वी उत्तरप्रदेश येथे गलाईचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच उत्तरप्रदेश येथील शर्मा याच्यासह त्याच्या साथीदारांना चोरीसाठी बोलावून घेतले होते. यापूर्वी चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, एक गावठी कट्टा, चार काडतूसे, गॅस सिलिंडर, स्कॉर्पिओ असा सुमारे ३ कोटी २५ लाख ५४ हजाराचा ऐवज आणि इतर साहित्य जप्त केले होते. त्यानंतर गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर आणि हवालदार संदीप नलावडे यांच्या पथकाने दि. १० फेब्रुवारी रोजी संशयित खान आणि कुरेशी या दोघांना उत्तर प्रदेशात पकडले. त्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून ट्रांजिट रिमांड घेऊन त्यांना सांगलीत आणले आहे. आटपाडी न्यायालयाने दि. २१ फेब्रुवारी पर्यंत त्या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत सागर लवटे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, अमिरशा फकीर, रणजित जाधव, दरिबा बंडगर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, संदिप गुरव, उदय माळी, अमर नरळे, अरुण पाटील, सुनील जाधव, सुरज थोरात, केरुबा चव्हाण, विक्रम खोत, रोहन घस्ते, सायबर ठाण्याचे अभिजित पाटील, अजय पाटील यांचा सहभाग होता.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापागुन्हे अन्वेषणच्या पथकाने चौघांना अटक केल्यानंतर उर्वरित साथीदार पसार होते. सांगली पोलिसांनी नुकतेच उत्तर प्रदेशातील सिढपुरा गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा मारून दोघांना ताब्यात घेत अटक केली. दोघांकडून उर्वरित साथीदारांची माहिती घेऊन तपास सुरू आहे.