सांगली : शहरातील शिवाजी मंडई व हिंदू मुस्लीम चौकातून दोघा वृद्धांचे मोबाईल अज्ञाताने लंपास केले. हिरालाल प्रेमजी शहा (रा. खणभाग) यांचा मोबाईल हिंदू मुस्लीम चौकातून लंपास करण्यात आला तर विवेक वासुदेव शिराळकर यांचा शिवाजी मंडईतून मोबाईल लंपास करण्यात आला. दोघांनीही शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
------
तासगाव-भिवघाट रस्त्यावर निवारा शेडची मागणी
सांगली : जिल्ह्यातील प्रमुख वर्दळीचा मार्ग असलेल्या तासगाव भिवघाट मार्गाचे काम सध्या गतीेने सुरू असलेतरी या मार्गावर ठिकठिकाणी निवाराशेडची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने रस्त्याचे काम पूर्ण करण्याबरोबरच या मार्गावर अजून निवारा शेड उभा करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. सध्या असलेले अनेक शेड जीर्ण झाले असून नवीन शेडची मागणी होत आहे.
----------
धोकादायक वीज जोडणी दुरुस्तीची मागणी
सांगली : मिरज तालुक्याच्या पूर्वभागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक ठिकाणी वीज तारा खाली आल्या आहेत. महावितरणच्यावतीने या धोकादायक स्थितीत असलेल्या वीज तारांची पुन्हा जोडणी करून मार्ग सुरक्षित करण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने या तारांमुळे अडचणी निर्माण होत आहेत.
-----
दुभाजकांमधील झाडे फुलली
सांगली : शहरातील कर्मवीर चौक, जिल्हा परिषद, काॅंग्रेस भवन परिसरात रस्त्यावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली झाडे आता चांगलीच बहरली आहेत. गेल्या पंधरवड्यापासून अधून मधून पाऊस सुरू असल्याने या झाडांना जीवदान मिळाले आहे. सध्या या झाडांमुळे रस्ते आकर्षक दिसत आहेत.
----
वडापचालकांवर कारवाईची मागणी
सांगली : शहरात चौथ्या स्तरातील निर्बंध लागू असतानाही सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. रिक्षा चालकांना केवळ चारजणांना प्रवासाची परवानगी असतानाही अनेकजण जादा प्रवासी घेऊन प्रवास करत असल्याने अशा चालकांवर कारवाईची मागणी होत आहे.