दोन लाख विद्यार्थ्यांची आजपासून शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:34+5:302021-07-07T04:32:34+5:30
सांगली : जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आठवी ते बारावी वर्गातील एक लाख ...

दोन लाख विद्यार्थ्यांची आजपासून शाळा सुरू
सांगली : जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आठवी ते बारावी वर्गातील एक लाख ९९ हजार ५१६ विद्यार्थ्यांची शाळा आजपासून (मंगळवार) सुरू होणार आहे. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनीही सर्व शाळांनी कोरोना नियमांचे पालन करून वर्ग सुरू करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. मागील वर्षात महिनाभर शाळा सुरू झाल्या होत्या; परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढताच शाळा बंद राहिल्या. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले; पण रुग्णसंख्येमुळे ऑफलाइन शाळा सुरू झाल्याच नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. याला विद्यार्थी आणि शिक्षकही कंटाळले आहेत. अखेर शिक्षण विभागाने सोमवारी आदेश काढून मंगळवार, दि. ६ जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिकच्या ७१७ शाळांमधील आठवी ते दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयामध्ये सुरू असलेले अकरावी ते बारावीचे वर्गही सुरू होणार आहेत. रुग्णसंख्या कमी असेल तेथे तात्काळ वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौकट
अशी आहे विद्यार्थिसंख्या
आठवी : ४४०९५
नववी : ४५२७२
दहावी : ४२१७६
अकरावी : ३३३४९
बारावी : ३४६२४
चौकट
एका वर्गात वीस विद्यार्थी
एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर, विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याच्या शिक्षकांनी सूचना द्याव्यात, मास्कचा वापर सक्तीने केला पाहिजे. विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे दिसल्यास घरी पाठविणे आणि लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे नियम शासनाने घालून दिले आहेत.
चौकट
अशी घ्यावी लागणार दक्षता
-शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे
-शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर, अँटिजन चाचणी करणे बंधनकारक.
- शाळेत स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा घेऊ नयेत
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी नियमित वाफ घेणे
-विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या सहमतीवरच अवलंबून