तासगाव : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी (ता. तासगाव) हद्दीत रविवारी सकाळी आठच्या सुमारास पिकअप टेम्पो आणि मोटार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सोपान मारुती सरगर (वय ३३) आणि नामदेव ज्ञानू सरगर (सध्या रा. लक्ष्मीनगर, साखर कारखानासमोर, सांगली, मूळ रा. कोळे, ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत. तर मोटारीतील जितेंद्र रमेश मोरे (वय ३८), रंजना रमेश मोरे (वय ५५), रमेश लिंगाप्पा मोरे (वय ६०, रा. नराळे, ता. सांगोला) हे तिघे जखमी झाले.
मूळचे कोळे येथील सोपान सरगर व नामदेव सरगर हे दोघेजण सध्या कुटुंबासह सांगलीत लक्ष्मीनगर येथे राहत होते. त्यांची कोळे येथे डाळिंबाची बाग आहे. ते सांगलीत फळांची विक्री करत होते. रविवारी सुटी असल्यामुळे दोघेजण पिकअप टेम्पो (एमएच १२ आरएन ६९०३) मधून कोळे येथे गावाकडे निघाले होते. कुमठे फाट्यावरून योगेवाडी येथे आल्यानंतर समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या मोटार (एमएच ०१ एव्ही ९५१२) च्या चालकाने विरूद्ध दिशेला येऊन टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की टेम्पो आणि मोटारीचा चक्काचूर झाला. टेम्पो चालवणाऱ्या सोपान यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या सोबत असलेले नामदेव सरगर आणि मोटारीतील तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना नामदेव सरगर यांचा मृत्यू झाला. मोटारीतील जितू मोरे, रंजना मोरे हे दोघे गंभीर जखमी आहेत. तर रमेश मोरे हे देखील जखमी झाले आहेत.अपघातानंतर सकाळी ८.४५ वाजता पोलिस पाटील मोहन सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस तत्काळ हजर झाले. अपघातानंतर रस्त्यावर गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृत सोपान यांचा मृतदेह तासगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. जखमींवर मिरज सिव्हिल आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातप्रकरणी मृत सोपान सरगर यांचे भाऊ नामदेव मारुती सरगर यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालक जितेंद्र मोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कोळे, सांगलीत शोककळा
फळ विक्रेते सोपान व नामदेव सरगर या दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सांगलीतील साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या दोघांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना धक्का बसला. नातेवाईकांसह अनेकांनी योगेवाडी येथे धाव घेतली. तसेच कोळे येथील नातेवाईकांना कळवले. त्यांनाही धक्का बसला. दोन्ही ठिकाणी शोककळा पसरल्याचे दिसून आले. सायंकाळी कोळे येथे अंत्यसंस्कार झाले.
कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
सोपान सरगर व नामदेव सरगर या दोघांनी कष्टातून संसार फुलवला होता. सोपान यांना दोन मुली, एक मुलगा तर नामदेव यांना तीन मुली आहेत. दोघांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.