बुधगावमध्ये गॅस गळतीत दोघे जखमी
By Admin | Updated: December 19, 2014 00:22 IST2014-12-18T22:22:21+5:302014-12-19T00:22:09+5:30
दुर्घटना टळली : तीन ठिकाणी गळती

बुधगावमध्ये गॅस गळतीत दोघे जखमी
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे मागील दोन दिवसात गॅस सिलिंडर गळतीच्या तीन घटना घडल्या. गॅस गळतीने लागलेली आग आटोक्यात आणताना एका महिलेसह दोघेजण भाजून जखमी झाले. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
बुधगावात मागील दोन दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरची गळती होऊन सिलिंडरने पेट घेतल्याचे तीन प्रकार घडले. आज, गुरुवारी सकाळी गावभागातील शिंदे गल्लीतील विश्वनाथ मारुती भारती यांच्या पत्नीने स्वयंपाकासाठी सिलिंडर चालू करून शेगडी पेटविली असता, सिलिंडरला आग लागली. प्रसंगावधान राखून घराबाहेर येऊन त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारील काही तरुणांनी त्यांच्या घरात जाऊन पेटलेल्या सिलिंडरवर वाळू, माती व ओले पोते टाकून आग आटोक्यात आणली. गळती लागलेला सिलिंडर घराबाहेर टाकून दिला. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
असाच प्रकार गुरव गल्लीतील नारायण कृष्णा पाटील व सुनील बबन कोळी यांच्या घरातही घडला. यापैकी नारायण पाटील यांच्या घरी पत्नी अनुसया व अन्य एक आग आटोक्यात आणताना भाजून जखमी झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सिलिंडर गॅस गळतीचे प्रकार वाढल्याने गृहिणींमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत लोकांनी संबंधित गॅस एजन्सीकडे तक्रारी केल्या असून, एजन्सीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. तरी एजन्सीने सिलिंडर तपासूनच वितरित करण्याची मागणी गॅस ग्राहकांतून होत आहे. (वार्ताहर)