रिळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:39+5:302021-02-11T04:28:39+5:30
पुनवत : रिळे (ता. शिराळा) येथील शेतकरी आनंदा नाथा पाटील यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ...

रिळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
पुनवत : रिळे (ता. शिराळा) येथील शेतकरी आनंदा नाथा पाटील यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. या हल्ल्यात अन्य एक शेळी जखमी झाली असून, त्यांचा पाळीव कुत्राही वस्तीवरून गायब झाला आहे.
रिळे येथे दत्तमंदिराजवळ शेतात आनंदा पाटील यांची वस्ती आहे. वस्तीवर पाच शेळ्या, गाय, म्हैस, कुत्रा अशी पाळीव जनावरे होती. बुधवारी पहाटे या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या, तर एक शेळी जखमी झाली आहे. वस्तीवर राखणीसाठी पाळलेला कुत्राही यादरम्यानच गायब झाला आहे. बिबट्याने त्याला पळवून नेले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
घटनास्थळी वनरक्षक हणमंत पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी थोरात यांनी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याच्या पायाचे ठसे याठिकाणी आढळून आल्याने वनरक्षक पाटील यांनी सांगितले. या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले असून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी व वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी उपसरपंच बाजीराव सपकाळ यांनी केली आहे. यावेळी पोलीसपाटील सुधीर पवार, संजय पाटील, संपत पाटील, दत्तात्रय पाटील, रामचंद्र पाटील, नामदेव खुजे आदी उपस्थित होते.