सांगली : वाल्मीकी आवास घरकुलात रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बापू कांबळे (वय २०) याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी करण महादेव गायकवाड (वय २०, रा. राजीव गांधीनगर, सांगली) आणि युवराज हणमंत कांबळे (वय १९ रा. टिबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. अटकेतील दोघांनी पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली आहे.सौरभ कांबळे हा वाल्मीकी आवास योजना परिसरात होता. करण गायकवाड हादेखील पूर्वी वाल्मीकी आवास घरकुलात राहत होता. मृत सौरभचा भाऊ विजय आणि करण यांच्यात वाद झाला होता. तेव्हा सौरभने करणच्या घरात जाऊन तक्रार केली होती. त्यामुळे करणला घरातून बाहेर काढले होते. त्यामुळे करणला सौरभ यांच्याविरोधात राग होता. करण नवीन वसाहत परिसरातील टोळक्याला घेऊन वाल्मीकी घरकुल परिसरात सतत येत होता.शनिवारी दुपारी सौरभ कांबळे घरकुल परिसरात होता. तेव्हा संशयित चौघे तेथे थांबले होते. त्यांची आणि सौरभची वादावादी झाली. तेव्हा चौघांनी दगडाने हल्ला केला. त्यानंतर सौरभ पळून जाऊ लागताच त्याचा पाठलाग केला. बिल्डिंग क्रमांक सातच्या खाली त्याला गाठले. त्याच्यावर एडक्याने हल्ला चढवला. गळ्यावर वार झाल्यानंतर सौरभ हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला. तेव्हा हल्लेखोर तेथून पसार झाले.खून झाल्याचे माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपाधीक्षक विमला एम. यांनी सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांना सूचना दिल्या. शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथक संशयिताच्या मागावर होते. तसेच गुन्हे अन्वेषणचे पथक पथकदेखील संशयितांचा शोध घेत होते.खुनातील मुख्य संशयित गायकवाड हा साथीदारांसह टिबर एरिया येथील हॉस्पिटलच्या पाठीमागे बंद गोदामात लपून बसल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी संतोष गळवे, गौतम कांबळे यांना मिळाली. पथकाने रात्रीच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकत करण गायकवाड, युवराज कांबळे याच्यासह दोन अल्पवयीन, अशा चौघांना ताब्यात घेतले. करण व युवराजला अटक करून कसून चौकशी केल्यानंतर पूर्वीच्या वादातून खून केल्याचे कबूल केले.पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, योगेश पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, प्रशांत पुजारी, विशाल कोळी, योगेश हाक्के, संदीप कोळी, गणेश कोळेकर, दिग्विजय साळुंखे आणि रमेश लपाटे यांच्या पथकाने कारवाई केली.
संशयिताला ‘मोका’ लागला होताकरण गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो अल्पवयीन असताना त्याला मोका लागला होता. तेव्हा पुण्यातील सुधारगृहातून तो साथीदारासह पळाला होता. त्याचे इतर साथीदार प्रथमच रेकॉर्डवर आले आहेत.